अष्टमी फेरीसाठीच्या अर्जांचे आज वितरण

0
4

>> पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्याकडून स्पष्ट

अष्टमीनिमित्त मांडवी किनारी जी फेरी भरत असते, त्या फेरीत दुकान थाटण्यासाठी लागणारे अर्ज मंगळवार दि. 5 सप्टेंबरला वितरित करण्यात येणार असल्याची माहिती पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी काल दिली.

या अर्जांचे सोमवारी वितरण करण्यात येणार असल्याचे समजून या फेरीत दुकान थाटू पाहणाऱ्या दुकानदारांनी काल पणजी महापालिकेच्या इमारतीबाहेर मोठी गर्दी केल्याने तेथे गोंधळ उडाला होता. या पार्श्वभूमीवर मोन्सेरात यांनी हे अर्ज मंगळवारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. हे अर्ज वितरित करण्यासाठीची प्रक्रिया ही मंगळवारपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट करतानाच, त्यावर पालिका आयुक्त व कर अधिकारी हे लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या फेरीनंतर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असतो व तो गोळा करण्यासाठी बराच खर्च येत असल्याचे दिसून आल्याने यावर्षी या दुकानांसाठीचे शुल्क वाढवण्यात येणार असल्याचेही मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. यंदा आम्ही कडकपणे ही प्रक्रिया पूर्ण करणार असून, कुणालाही एकापेक्षा जास्त अर्ज दिले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काल अर्ज नेण्यासाठी आलेल्या दुकानदारांनी आम्ही गेल्या 3 दिवसांपासून या अर्जांच्या प्रतीक्षेत असून, हे अर्ज मिळवण्यासाठी दररोज महापालिकेच्या कार्यालयात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी या अर्जावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. हे अर्ज नेण्यासाठी आलेल्या असंख्य दुकानदांना ते न मिळाल्याने त्यांनी या अर्जांचा काळाबाजार झाल्याचा व हे अर्ज अव्वाच्या सव्वा दरात काळ्याबाजारात विकल्याचा आरोप केला होता.