दिग्गज अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीच्या समाप्तीनंतर अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना अचंबित केले. अश्विन या कसोटीत भारतीय संघाचा भाग नव्हता. संघ व्यवस्थापनाने डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजावर या कसोटीसाठी विश्वास दाखवला होता. गुलाबी चेंडूने झालेल्या दुसऱ्या कसोटीत अश्विनने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ही कसोटी त्याच्या भव्यदिव्य अशा कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरली. मालिकेतील पहिल्या कसोटीतही अश्विनऐवजी वॉशिंग्टन सुंदर याला संघात जागा देण्यात आली होती. तिसऱ्या कसोटीचा शेवटचा दिवस सुरू असताना भावुक झालेला अश्विन अचानक टीव्ही स्क्रीनवर झळकला. बाजूला बसलेला विराट अश्विनची गळाभेट घेतानाचे दृश्य संपूर्ण जगाने पाहिले. यावेळीच मनात शंकेची पाल चुकचुकली होती. अश्विन निवृत्ती तर जाहीर करत नाही ना? सामना अनिर्णित राहिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासोबत अश्विनला पाहिल्यावर त्याच्या निवृत्तीवर शिक्कामोर्तब जवळपास झाले होते. ही मालिका आपली शेवटची असेल, असे अश्विन सांगणार असल्याचे वाटत होते. परंतु, तत्काळ प्रभावाने निवृत्ती जाहीर करत त्याने सर्वांना धक्काच दिला.
अश्विनच्या निवृत्ती घेण्याला एक छोटीशी परंतु, महत्त्वाची पार्श्वभूमी असावी असा अंदाज बांधला जात आहे. ती म्हणजे भारताचा मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेला पराभव..या मालिकेतील पहिल्या कसोटीत अश्विनला केवळ एकच बळी मिळविता आला होता. दुसऱ्या कसोटीत पाच व तिसऱ्या कसोटीत केवळ तीन बळी त्याच्या वाट्याला आले होते. मायदेशात फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर गोलंदाजीत अपेक्षित कामगिरी करता न आल्याचे शल्य स्वतःसाठी उंच मापदंड ठेवणाऱ्या अश्विनसाठी निवृत्तीची खुणगाठ बांधण्यासाठी पुरेसे ठरणारे होते. वॉशिंग्टन सुंदर याच्या रुपात युवा प्रतिभावान फिरकीपटू संघाचे दार ठोठावत असताना संघातील जागा रिकामी करण्याची योग्य वेळ त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यावर निवृत्ती जाहीर करत निवडली.
अश्विनला कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 11 मालिकावीर पुरस्कार प्राप्त झाले आहे. या बाबतीत केवळ मुरलीधरन त्याच्या बरोबरीत आहेत. याच वर्षाच्या सुरुवातीला त्याने कसोटीत 500 बळींचा टप्पा पार केला. केवळ 98 कसोटींत त्याने हा मैलाचा दगड ओलांडला. कसोटीतील भारताचा सर्वांत नावाजलेल्या अष्टपैलूंमध्ये कपिलदेव यांचे नाव अग्रस्थानी येत असेल तर यानंतर नक्कीच रविचंद्रन अश्विन याचा क्रमांक लागतो. ऑफस्पिन ही कला तशी क्रिकेटमध्ये फारशी लोकप्रिय नाही. ऑफस्पिन गोलंदाजांकडे फारशी विविधता देखील नसते, अश्विन मात्र त्याला अपवाद ठरला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एका मर्यादित षटकांच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू सुनील नारायण याच्या गोलंदाजी शैलीची ‘कॉपी’ करताना त्याने पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या नारायणलादेखील तोंडात बोटे घालायला भाग पाडले होते. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमला याला टाकलेला तो ‘कॅरम बॉल’ अजूनही कित्येक वर्षांनंतरही ताज्या व्हिडिओप्रमाणे फिरत आहे. टी-ट्वेंटी विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महंमद नवाझच्या गोलंदाजीवर वाईड चेंडू सोडताना अश्विनने दाखवलेली समयसूचकता त्याच्या सुपीक डोक्याची कल्पना देते. अश्विनने भारतासाठी 106 कसोटी, 116 वनडे आणि 65 टी-20 सामने खेळले असून त्याने सर्व प्रकारात 765 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत तब्बल सहा शतके व 14 अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. सहकारी रवींद्र जडेजा याच्यासह त्याने विशेषकरून मायदेशांतील मालिकांमध्ये मागील दशकभर भारतीय फिरकीचा भार वाहिला आहे. भारताला कसोटी क्रिकेटच्या शिखरावर नेण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे.
वेस्ट इंडीजविरुद्ध अश्विनने कसोटी पदार्पणात केलेली प्रभावी कामगिरी अजूनही काल-परवाच केल्यासारखी वाटते. अश्विनने निवृत्ती घेतली देखील ही मनाला अजूनही न पटणारी गोष्ट आहे. अश्विनसारख्या हिऱ्याने सामना न खेळता निवृत्त होणे, सच्च्या क्रिकेटप्रेमीसाठी नक्कीच क्लेषदायी आहे. समारोपाचा सामना खेळून घरच्या प्रेक्षकांसमोर अश्विनने निवृत्ती स्वीकारली असती, तर नक्कीच चांगले वाटले असते. पण, संपूर्ण कारकिर्दीत अकल्पित कामगिरी केलेल्या या अवलियाच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सहज साध्य होणार नाही, हे मात्र नक्की.