गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभाग, गुन्हा अन्वेषण विभाग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन सुरक्षा अंतर्गत काल मोठी कारवाई केली. अल्पवयीनांच्या अश्लील चित्रफिती सोशल मीडिया साईट्सवर पोस्ट करणाऱ्या पाच तरुणांना राज्यातील वेगवेगळ्या भागांतून अटक करण्यात यश मिळविले.
केंद्रीय यंत्रणेने गोव्यातून अल्पवयीनांच्या आक्षेपार्ह चित्रफिती सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर तपास यंत्रणेने तपासाला सुरुवात केली. अटक केलेल्यांमध्ये एक संशयित स्थानिक असून, इतर चौघे परप्रांतीय आहेत. सलमान खान (20, रा. चिंबल, मूळ रा. मध्यप्रदेश), मजूर महेंद्रसिंग (27, रा. बेती बाझार बार्देश, मूळ उत्तर प्रदेश), लेमन इस्लाम (24, रा. कळंगूट, मूळ पश्चिम बंगाल), नितीन रेडकर (23, रा. कळंगुट, मूळ सिंधुदुर्ग) आणि प्रणित लोलयेकर (24, रा. दवर्ली) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी चार वेगवेगळी पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली होती. संशयित कुठून अश्लील चित्रफिती प्रसारित करतात, त्याचे लोकेशन प्रथम शोधून काढण्यात आले. त्यातील पहिल्या संशयिताला मायणा-कुडतरी भागातून मोबाईलसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अन्य सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले. माहिती-तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66 (3) नुसार ही कारवाई करण्यात आली.