अवीट गझलांनी रसिक तृप्त

0
107
कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहातील गझल कार्यक्रमात गाताना शांती हिरानंद. बाजूस सहगायक विद्या राव व तबल्यावर नवाब अली. (छाया : किशोर स. नाईक)

गझल, कथ्थक महोत्सवाचा समारोप
संगीत नाटक अकादमी नवी दिल्लीतर्फे कला अकादमी, गोवाच्या सहयोगाने गेले चार दिवस मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात बेगम अख्तर यांच्या जन्मशताद्बीनिमित्त सुरू असलेल्या गझल व कथ्थक महोत्सवाची काल ज्येष्ठ गायिका पद्मश्री श्रीमती शांती हिरानंद यांच्या रसिल्या गझल गायनाने व पद्मभूषण उमा शर्मा यांच्या प्रभावी कथ्थक नृत्याने सांगता झाली.बेगम अख्तर यांचे शिष्यत्व लाभलेल्या श्रीमती हिरानंद यांच्या ‘ऊन आँखोका आलम गुलाबी गुलाबी तेरे दिल की हालत शराबी शराबी…’ व बेगम अख्तर यांनी गाऊन लोकप्रिय केलेल्या ‘ऐ मुहब्बत तेरे अंजामसे रोना आया…’ या गायिलेल्या गझलांना चांगली दाद मिळाली. त्यांना त्यांच्या शिष्या विद्या राव (ज्यांना नैना देवी व गिरीजा देवी यांचेही शिष्यत्व लाभलेय) यांनी गायनाची पुरक साथ दिली. नवाब अली (तबला) सलामत अली (संवादिनी), घन:शाम सिसोडीया (सारंगी), सलामत अली (संवादिनी) या वादकांची साथही रंगतदार होती.
सुंदर प्रसाद, शंभू महाराज, बिरजू महाराज यांचे शिष्यत्व लाभलेल्या श्रीमती उमा शर्मा यांनी आपल्या नृत्याची सुरवात बेगम अख्तर यांच्या हमरी अटरियापे आवे सावरिया… या गझलवरील नृत्यविष्काराने केली. त्यातील अभिनय व सौंदर्यभाव विलक्षण सुंदर होता. जयपूर आणि लखनौ नृत्य शैंलीचा संगम साधून त्यानी केलेली अदाकारी मनभावन होती. हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ काव्यावरही नृत्यविष्कार घडवून दाद घेतली. काहे को मेरे घर आये हो… या बिंदादिन महाराजांच्या ठुमरी रचनेवर त्यांनी केलेले नृत्य प्रभावी होते. बेगम अख्तर यांच्या आठवणीनांही त्यांनी यानिमित्ताने उजाळा दिला. त्यांच्या शिष्या दिव्या, सुकृती, अनुष्का, सीमा, ज्योती व उमा यांनीही सुरेख नृत्य विष्काराने रसिकांची मने जिंकली. त्यांना इम्रानखान (गायन), मुबारक खान (तबला), खलीद मुस्ताफा (सितार), कमल अहमद (सारंगी), योगराज पनवार (पढंत) यांची बहारदार साथ लाभली. महोत्सवात जैनेंद्र सिंग यांचे रसिले सूत्रसंचालन होते. समारोपाच्या मैफलीतील कलाकारांचा गोवा शासनाचे संस्कृती सचिव फैजी हश्मी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संगीत नाटक अकादमीच्या सचिव हेलेन आचार्य यांनी आभार प्रदर्शन केले.