अवशेष दर्शन सोहळ्यास 70 लाख ते 1 कोटी भाविक उपस्थित राहणार

0
2

>>दर्शन समितीचे निमंत्रक फादर हेन्री फाल्कांव यांची माहिती

येत्या 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 या दरम्यान जुने गोवे येथे होणार असलेल्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या अवशेष दर्शन सोहळ्याला जगभरातून सुमारे 70 लाख ते एक कोटी भाविक हजर राहणार असल्याचे अवशेष दर्शन समितीचे निमंत्रक फादर हेन्री फाल्कांव यांनी काल सांगितले.
ह्या अवशेष दर्शन सोहळ्याला हजर राहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना नोंदणी करण्यासाठी एक ॲप तयार करण्याची जी योजना ठरवली होती ती आता रद्द करण्यात आली असल्याचे फा. फाल्कांव यांनी काल स्पष्ट केले. ॲप असेल पण भाविकांना नोंदणी करण्यासाठी नव्हे तर ते सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या विषयीची माहिती देण्यासाठी असेल, अशी माहिती त्यांनी दिली. या सोहळ्यासाठी येणाऱ्या दिव्यांगांसाठी एक वेगळे काऊंटर असेल व तेथे त्यांना व्हिलचेअर, ई-रिक्षा, बगी आदी सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे फा. फाल्कांव यांनी स्पष्ट केले. दर दहा वर्षांनी सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचा अवशेष दर्शन सोहळा जुने गोवे येथे होत असून यापूर्वीचा अवशेष दर्शन सोहळा हा 2014 साली झाला होता. अवशेष दर्शन सोहळ्याची ही परंपरा सुरु झाल्यापासून आतापर्यंत 27 वेळा संपन्न झालेला असून येत्या नोव्हेंबर महिन्यात होणारा अवशेष दर्शन सोहळा हा 28 वा सोहळा असेल.