आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अवयदान करण्याचा निर्णय आपले दु:ख गिळून घेणे हे सोपे काम नव्हे. त्यामुळे असा निर्णय घेतलेल्या कुटुंबीयांचा आज येथे सत्कार करताना आपल्याला गलबलून आल्यासारखे झाल्याचे उद्गार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल काढले. अशा कुटुंबीयांचा सत्कार करण्यासाठी काल राजभवन येथील दरबार हॉल येथे ‘नमन दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राणे यांनी वरील उद्गार काढले.
यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील अवयव प्रत्यारोपण पथकाचाही सन्मान करण्यात आला.
अवयव दानानंतर अवयव प्रत्यारोपण करून गोमेकॉतील डॉक्टर व अन्यांच्या पथकाने राज्यातील कित्येक लोकांचे प्राण वाचवण्याचे अनमोल असे कार्य केले आहे, अशा शब्दांत मंत्री राणे यांनी यावेळी ह्या पथकाचा गौरव केला.
आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीच्या अवयवांचे दान केलेल्यांचा यावेळी राज्यपाल पी. एस्. श्रीधरन पिल्लाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आरोग्य सचिव अरुण कुमार, आरोग्य संचालक गीता काकोडकर, गोमेकॉचे डीन एस्. एम्. बांदेकर व डॉक्टर व परिचारिका आदी मंडळी उपस्थित होती.