जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह राज्याच्या विविध भागात काल रात्री अवकाळी पाऊस जोरदार बरसला. जोरदार बरसलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
राज्यातील काही भागांत गडगडाटासह पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने सोमवारी वर्तवला होता. उत्तर व दक्षिण गोव्यातील वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळू शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले होते.
काल रात्री १० च्या नंतर राजधानी पणजीत जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे दुचाकीचालक व पर्यटकांची थोडी धांदल उडाली. साखळी, काणकोण, करमळी, ताळगाव, वास्को, चिंबल, होंडा, म्हापसा, हळदोणा या भागात देखील पाऊस कोसळला.