अवकाळी पाऊस; आजारांना आमंत्रण

0
6
  • डॉ. मनाली महेश पवार

एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होण्याआधीचा काही कालावधी म्हणजे ऋतुसंधी. या काळात चालू ऋतूबरोबर पुढे सुरू होणाऱ्या ऋतूची काही लक्षणे किंवा बाह्य वातावरणामध्ये बदल घडून येतात. त्यामुळे मानवी शरीर व मनाला बाह्य वातावरणात घडत असलेले दोन्ही बदल सात्म्य व्हायला थोडा वेळ लागतो व त्यातही आपले शरीरबल व मानसिक बल कमी असेल तर विविध आजारांना आमंत्रण मिळते.

गेल्या काही दिवसांत उष्णता/तापमान एवढे वाढले होते की जीव नुसता हैराण झाला होता. नुसता अंगातून घाम ओतायचा. सारखी तहान, अंगाचा दाह, यामुळे मिळेल ते पाणी, थंड पेये, कोल्ड्रिंग्स, उसाचा रस, कैरीचे पन्हे, फळांची सरबते इत्यादी पिण्यात यायचे. त्यात मे महिना म्हणजे मुलांच्या सुट्टीचे दिवस. मग आजच्या ट्रेंडप्रमाणे बाहेरगावी फिरणे आले. म्हणजे मिळेल ते खाणे आणि मिळेल ते पिणे! सगळेच बाहेरचे! आणि अशातच पावसाने हजेरी लावली…
गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन असताना अचानक हवेत गारवा/आर्द्रता निर्माण झाली. तापमान काही अंशाने कमी झाले. परत काही काळात सूर्यदेव संतप्त होऊन तापमान वाढले. यासारख्या बदलत्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.
अवकाशी पाऊस म्हणजे काय?
पावसाळ्याचा काळ सोडून पडणारा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस. भारतात 1 जून ते 30 सप्टेंबर हा काळ पावसाचा असे आपण मानतो. ठरावीक वेळापत्रकाप्रमाणे हा पाऊस कधी पडत नाही, मागे-पुढे होतो. पण हा पाऊस जेव्हा साधारण मे महिन्यामध्येच भरपूर उष्णता वाढलेली असताना ढगफुटीप्रमाणे कोसळतो तेव्हा त्याला अवकाळी पाऊस म्हणतात. मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरचा काळ हा सायक्लोन सिझन म्हणून ओळखला जातो. या काळात कमी दाबाचे पट्टे, वादळं, चक्रीवादळं तयार होतात आणि त्यांच्या प्रभावामुळे पाऊस पडतो. उष्ण वारे आणि थंड वारे एकमेकांना भिडल्याने हवा वर जाते आणि उंचावर ढग निर्माण होतात. अशा ढगांची उंची खूप जास्त असेल तर त्यातून गारांची निर्मिती होते आणि त्या खाली कोसळल्यावर गारपीट होते. अशा पावसामुळे गाव-शहरातले जनजीवन विस्कळीत होते. शेतीचे, फळांचे, उद्योगाचे नुकसान होते आणि आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. विविध संसर्गजन्य आजार उद्भवण्याचा हा काळ आहे.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होण्याआधीचा काही कालावधी म्हणजे ऋतुसंधी. या काळात चालू ऋतूबरोबर पुढे सुरू होणाऱ्या ऋतूची काही लक्षणे किंवा बाह्य वातावरणामध्ये बदल घडून येतात. त्यामुळे मानवी शरीर व मनाला बाह्य वातावरणात घडत असलेले दोन्ही बदल सात्म्य व्हायला थोडा वेळ लागतो व त्यातही आपले शरीरबल व मानसिक बल कमी असेल तर विविध आजारांना आमंत्रण मिळते.

अवकाळी पावसामुळे होणारे आजार

  • अवकाळी पावसामुळे श्वसनमार्गाचे, पचनसंस्थेचे तसेच संसर्गजन्य आजार वाढीस लागतात.
  • सर्दी, खोकला, ताप, त्यात ‘अंगमोड’ ही विशेष लक्षणे पाहायला मिळतात.
  • भूक न लागणे, उलट्या, जुलाब, पोट फुगणे, जंत इत्यादी पचनसंस्थेचे विकार जन्मास येतात व त्यात काविळचे प्रमाण वाढते.
  • अचानक होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य विषाणू श्वसनमार्गाच्या वरच्या भागाला संसर्ग करून नाक व घशावर परिणाम करतात. त्यामुळे नाक बंद होणे, घसा खवखवणे, घसा दुखणे, खोकला, ताप आदी लक्षणे दिसू लागतात.
  • या काळात डासांचा प्रादूर्भावही भरपूर प्रमाणात वाढतो. त्याचा परिणाम म्हणून टाइफॉईड, मलेरिया, फ्लूसारखे आजार उद्भवू लागतात.
  • अतिसार (हगवण) हा आजार अवकाळी पावसामुळे उद्भवू शकतो.
  • त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येणे, नखांचे संक्रमण यांसारखे बुरशीजन्य संसर्गदेखील वाढीस लागतात.
  • थकवा, निरुत्साहासारखे मानस आजारदेखील काही प्रमाणात दिसतात.
  • या अवकाळी पावसाचा जोर सध्या वाढत चालला आहे, त्यामुळे बुरशीजन्य संसर्गदेखील वाढीस लागतो.
  • थकवा, निरुत्साहासारखे मानस आजारदेखील काही प्रमाणात दिसतात.

या अवकाळी पावसाचा जोर सध्या वाढत चालला आहे, त्यामुळे वरील आजारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
अगदी लगेच एका दिवसात आहार-विहार बदलता येत नाही व तसा तो बदलू नये. पण हळूहळू ऋतुबदलाप्रमाणे आहारामध्ये-विहारामध्ये बदल घडवावेत म्हणजे या आजारांपासून आपण स्वतःला दूर ठेवू शकतो.

कोणती काळजी घ्यावी?

  • सर्दी, घसा दुखणे, ताप आल्यासारखे वाटणे असा त्रास वाटत असेल तर तुळशीची पाने, अडुळशाचे पिकलेले पान, लवंग, मिरी, कांदा घालून तयार केलेला काढा दिवसातून दोन वेळा सेवन करावा.
  • हळदीचे दूध गरम-गरम प्यावे.
  • ज्येष्ठमधाचे चूर्ण पाव चमचा मधासोबत दोन-तीन वेळा चाटावे.
  • सर्वप्रकारच्या श्वसनमार्गातील आजारांसाठी प्रत्येकाने सीतोफलादी चूर्ण घरी आणून ठेवावे. संसर्गजन्य कोणताही श्वसनाचा त्रास सुरू होण्यापूर्वीच अर्धा चमचा सीतोफलादी चूर्ण मधाबरोबर, तुपाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर वैद्याच्या सल्ल्याने सेवन करावे. लहान मुलांना देताना दुधातून पाव चमचा चूर्ण द्यावे.
  • ज्येष्ठमध, वासावलह, गुडूची सत्त्व, अंशमती वटीसारखी औषधे वैद्याच्या सल्ल्याने घरात असावीत.
  • जुलाब होत असल्यास लंघन करावे. मुस्तादिसिद्ध जल पिण्यासाठी द्यावे. आमावस्था असल्यास दीपन, पाचन, ग्राही औषधांचा वापर करावा. लगेच एखादी संडास बंद व्हायची गोळी घेऊन संडास बंद करू नये. संजीवनी वटी अशा जुलाबामध्ये उपयोगी पडते. वैद्याच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत. थोडं बरं वाटल्यावर गोड ताकासारखा लघु आहार घ्यावा.
  • फ्रीजमधील थंड पाणी पिऊ नये. पाणी भरपूर उकळून काढ्याप्रमाणे प्यावे म्हणजे पाण्यामुळे होणारे आजार टाळता येतात.
  • उलट्या होत असल्यास लंघन करावे. आल्याचा रस सैंधव टाकून चाटण करावा किंवा लिंबू व आल्याचा रस घ्यावा.
  • पोट फुगल्यासारखे वाटणे, अपचन होणे यासाठी हिंग्वाष्टक चूर्ण भात व तुपासोबत सेवन करावे.
  • मलावरोध असल्यास त्रिफळाचूर्ण घ्यावे.
  • शक्यतो सर्वांगाला रोज तेल लावावे. तेल नारळाचे किंवा तिळाचे असावे व कोमट असावे. छातीत कफ झाल्यासारखा वाटत असेल तर तेलात थोडे मीठ टाकून, तेल कोमट करून छातीला चोळावे म्हणजे छातीतील कफ सुटतो.
  • त्याचबरोबर घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा.
  • पचायला जड व तेलकट पदार्थ टाळावे. आहार ताजा व गरम असावा. जेवणामध्ये साधा पचायला हलका असा आहार असावा.
  • फोडणीसाठी हिंग, जिरे, धणे, दालचिनी, तमालपत्र, आले, हळद अशा मसाल्यांचा वापर करावा.
  • बाहेर जाताना छत्री किंवा रेनकोट बरोबर असावा.
  • हवाशुद्धीसाठी सकाळ-संध्याकाळ वेखंड, सुंठ, ओवा, कडुनिंबाची सुकवलेली पाने, गुग्गुळ याने संपूर्ण घर व आजूबाजूच्या परिसराचे धूपन करावे.
  • स्नानासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
  • दिवसा झोपणे टाळावे.
  • साधा, शरीराला झेपेल असा व्यायाम करावा.
    अशाप्रकारे ऋतूमध्ये होणाऱ्या बदलांसाठी स्वतःचे शरीर व मानस यामध्ये बदल घडवून आणावेत. आहार व विहाराचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे आजार वाढताना दिसत असल्यास योग्य वैद्याचा सल्ला घ्यावा.