अल्पवयीन मुलाचा डोक्यात दगड घालून खून

0
11

>> विठ्ठलापूर – साखळी येथील घटना; संशयिताचे घटनास्थळावरून पलायन; कामावरून काढल्याचा राग; पोलिसांकडून शोध सुरू

विठ्ठलापूर – साखळी येथे शनिवारी मध्यरात्री एका 12 वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून खून करून फरार झालेल्या संशयित चंदू पाटील याचा पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठलापूर येथील एका डेअरी फार्ममध्ये संशयित चंदू पाटील (शेगाव -महाराष्ट्र) हा कामावर होता. मात्र, तो दारू पीत असल्याने मालकाने त्याला कामावरून कमी केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी उत्तर प्रदेशमधील अर्षद अली, त्याचा भाऊ आणि अजून एक कामगार यांना तेथे कामावर ठेवले होते. नवीन कामगारांना कामावर ठेवल्याने चंदू याने तेथे जाऊन नवीन कामगारांशी वाद घातला होता.

संशयित चंदू याने आपल्याला कामावरून काढून दुसऱ्याला कामावर ठेवल्याचा राग मनात ठेवून शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास डेअरी फार्मच्या ठिकाणी जाऊन अर्षद याच्या 12 वर्षीय भावाला उठवले आणि त्याला गोठ्याशेजारी नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. खून केल्यानंतर संशयिताने डेअरी मालकाची दुचाकी घेऊन तो थिवी रेल्वे स्थानकावर गेला आणि तिथून रेल्वेने पसार झाला. पहाटे ही महिती उघड झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्या संशयिताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयित चंदू पाटील याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

दोन दिवसांपूर्वी आले होते गोव्यात

उत्तर प्रदेश येथील अर्षद अली हा त्याच्या 12 वर्षीय भावासह दोन दिवसांपूर्वी गोव्यात आले होते. गुरुवार दि. 19 रोजी अर्षद विठ्ठलापूर साखळी येथील एका डेअरी मालकाजवळ गेला असता त्या डेअरी मालकाने त्याला कामावर ठेवले.

घटना पहाटे आली उघडकीस

शनिवारी रात्री काम संपवून अर्षद अली आपला 12 वर्षीय भाऊ आणि अन्य एका कामगारासह डेअरीलगतच्या खोलीत झोपायला गेले. रात्री 11.30 पर्यंत ते जागे होते. त्यानंतर ते झोपले. मध्यरात्री संशयित चंदू त्या ठिकाणी आला आणि त्याने खोलीचे दार उघडून झोपलेल्या अर्षदच्या भावाला उठवून बाहेर नेले आणि त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. पहाटे 4 वा. सुमारास खोलीत झोपलेल्या एकाला जाग आली असता अर्षदचा भाऊ खोलीत दिसला नाही. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो गोठ्याबाहेर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला.
याची माहिती डेअरी मालकाला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या मुलाला साखळी आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृतदेह इस्पितळात

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. तत्पूर्वी त्या मुलाला इस्पितळात दाखल करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

संशयिताचा शोध सुरू

घटनेनंतर रेल्वेने फरार झालेला संशयित चंदू हा शेगाव महाराष्ट्र येथील असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.