>> नवेवाडे-वास्को येथील घटना; चालक ताब्यात
नवेवाडे-वास्को येथील मुख्य रस्त्यावर एका अल्पवयीन दुचाकीचालकाने महिलेला ठोकरल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. तिला त्वरित उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हा अपघाता काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घउला. मृत महिलेचे नाव ममता महेश शेट्ये (५९) असे असून, ती मुरगाव पालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होती. या प्रकरणी अल्पवयीन दुचाकीचालक मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवेवाडे येथील आपल्या भावाच्या दुकानावर जाताना ममता शेट्ये या महिलेला सदर अल्पवयीन दुचाकीचालकाने मागाहून धडक दिली. ममता यांच्यासह अन्य दोन महिला रस्ता पार करत होत्या, त्याचवेळी अचानक या दुचाकीची धडक त्यांना बसली. धडकेबरोबर त्या उसळून रस्त्यावर आदळल्या, तर दुचाकीवरील दोघेजण रस्त्याबाजूला असलेल्या विक्रेत्यांच्या सामानात कोसळले. जखमी ममता हिला नागरिकांनी त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉक्टरानी तिला मृत घोषित केले.
या प्रकरणातील दुचाकीचालक हा अल्पवयीन असल्याची माहिती वास्को पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी दिली असून, त्याची रवानगी तिसवाडी मेरशी येथील अपना घरमध्ये करण्यात येणार आहे. ममता हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव हॉस्पिसियोत पाठवला आहे.