>> विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी घातला गोंधळ
राज्य सरकारने केवळ दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन बोलावल्याने संतापलेल्या विरोधकांनी काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे आपले अभिभाषण सादर करण्यास उभे राहिले असता सभागृहात एकच गोंधळ घातला व सभापती रमेश तवडकर यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी केली. मात्र, सभापतींनी त्यांना राज्यपालांच्या अभिभाषणात अडथळा आणू नका, अशी सूचना केल्याने आणि राज्यपालांनी आपले भाषण सुरू केल्यामुळे संतप्त बनलेल्या काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या आमदारांनी यावेळी सभात्याग केला.
काल सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे अन्य आमदा एल्टन डिकॉस्टा व कार्लुस फेरेरा, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस व क्रूझ सिल्वा, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारने अल्पकालीन हिवाळी अधिवेशन बोलावल्याबद्दल सभागृहात एकच गोंधळ घातला. यावेळी सभापती रमेश तवडकर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण विरोधक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे सभापतींनी राज्यपालांना त्यांचे अभिभाषण सादर करण्यास सांगितले.
यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी संताप व्यक्त करताना जे दोन दिवसांचे अधिवेशन बोलावले आहे, त्यातील पहिल्या दिवशी म्हणजेच (गुरुवारी) राज्यपालांचे अभिभाषण होणार असून, विरोधकांना जनतेच्या समस्या व प्रश्न मांडण्यासाठी केवळ उद्याचा (शुक्रवार) एक दिवस मिळणार असल्याचे सांगितले. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधकांनी अल्पकालीन अधिवेशनाला आक्षेप घेतला होता. त्याची नोंद कामकाज सल्लागार समितीच्या अहवालात का नाही, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला व सदर अहवालाला आक्षेप घेतला.
यावेळी बोलताना गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी, केरळ राज्यात चालू वर्षी 22 दिवस विधानसभा अधिवेशन झाले आहे. त्याच्या तुलनेत गोव्यात अत्यल्प दिवस अधिवेशन झाल्याचे सभागृहाच्या नजरेत आणून दिले. याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
विजय सरेदसाईंकडून अनोखा निषेध
राज्यपालांनी अभिभाषण सुरुच ठेवल्याने काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. मात्र, विजय सरदेसाई यांनी सभात्याग न करता राज्यपालाचे अभिभाषण चालू असताना सुमारे तासभर हातात फलक घेऊन सभागृहात उभे राहणे पसंत केले. तासभर उभे राहून त्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला. निषेध व्यक्त करण्यासाठी ते काळ्या रंगाचा पेहरावच करून सभागृहात आले होते. रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर यांनी मात्र यावेळी गप्प बसणेच पसंत केले.