अलौकीक योगसाधकाचा अस्त

0
136

– डॉ. अनुराधा ओक
पुण्यातील कबीरबाग योगसंस्थेचे डॉ. करंदीकर हे माझे वडील १९७८ मध्ये प्रथम बी. के. एस. अय्यंगार यांच्याकडे म्हणजे गुरुजींकडे गेले होते. स्वत: डॉक्टर असणार्‍या बाबांना गुरुजींनी योगाच्या माध्यमातून विकार बरे करता येतील असे सांगितले. तो सल्ला प्रमाण मानून बाबांनी योगाभ्यासास सुरुवात केली. गुरुजींनी बाबांना सल्ला दिला की, ‘तू डॉक्टर आहेस. यापुढे व्याधीग्रस्तांसाठी योगोपचाराचे काम सुरू ठेव’. त्यानुसार कबीरबाग योग संस्था या प्रकल्पाची सुरुवात झाली. मी स्वत: १९८४ ते १९९४ अशी दहा वर्षे गुरूजींकडे योग प्रशिक्षणासाठी गेले होते. माझी धाकटी बहीण पोलिओची रूग्ण होती. तिला गुरुजींकडे योगोपचार देण्यात आले. त्यातून तिच्यामध्ये हळुहळू फरक पडू लागला. पुढे तिला नृत्याचे धडे द्यावेत असे गुरुजींनी सांगितले. त्यानुसार तिने ललित कला केंद्रातून कथ्थक नृत्यामध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अशा पध्दतीने तिच्यावरील उपचारासाठी गुरुजींनीघेतलेली मेहनत फळाला आली.
गुरुजींनी योगसाधनेच्या क्षेत्रात केलेले कार्य खरोखरच अलौकीक आहे. जगाच्या दृष्टीने विचार केला तर गुरुजींनी योग प्रसाराच्या कार्याला सुरूवात केली तोपर्यंत योगसाधना ही सर्वांसाठी उपलब्ध नव्हती. त्यामुळे ठराविक लोकच तिचा लाभ घेत होते. शिवाय योगसाधना ही मोठी कठीण गोष्ट असून ती शिकणे आपल्या आवाक्यातील काम नाही असाही समज होता. अशा परिस्थितीत गुरुजींनी योगसाधनेचे सुलभीकरण केले. त्यातून ‘अय्यंगार योग’ ही संकल्पना समोर आली. त्याद्वारे योगाची वेगळ्या प्रकारची शैली जगाला मिळाली. गुरुजींनी अथक परिश्रम घेत भारताबरोबरच विविध देशांमध्ये योग प्रसारावर भर दिला. जगभरात त्यांचे दहा लाखांहून अधिक साधक आहेत. यावरून गुरुजींच्या योग प्रसाराच्या कार्याचे महत्त्व लक्षात येईल. गुरुजींनी पुण्यामध्ये अय्यंगार इन्स्टिट्युटची स्थापना करून सर्वांसाठी योग साधनेचा मार्ग उपलब्ध करून दिला. येथे योगाभ्यासावर विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवले जातात. आजवर या संस्थेतील योग शिक्षणाचा लाभ घेणे अनेक सामान्यांना शक्य झाले आहे. या सार्‍या प्रयत्नातून पुणे हे योगाभ्यास आणि योगोपचाराचे प्रमुख केंद्र बनले. आज अमेरिकेत या दोन्हीलाही राजमान्यता आहे. गुरुजींनी योगाभ्यासासंदर्भात अतिशय सोप्या भाषेत लिहिलेली पुस्तकेही मोलाचे मार्गदर्शन करणारी आहेत. विशेषत: त्यांनी पतंजली योगावर लिहिलेले पुस्तक योगासनांचा फायदा होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अय्यंगार इन्स्टिट्यूटमध्ये महिलासाठीही योगासन वर्ग घेतले जातात. अलीकडे प्रत्येक क्षेत्रातील जिवघेणी स्पर्धा, वाढते ताण-तणाव, प्रदूषण याचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. रक्तदाब, मधुमेह यासारख्या विकारांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत ताण वेळीच कमी करणे आणि मन:शांती मिळवणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. हे अय्यंगार यांनी वेळीच ओळखले आणि बदलत्या काळाची ही गरज लक्षात घेऊन त्यांनी सार्‍यांसाठी योगसाधनेचा मार्ग खुला करून दिला. अर्थात, काही वर्षांपूर्वी योगसाधनेचा विषय लोकांना समजून देणे, त्याबाबत आवड निर्माण करणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती. परंतु हे आव्हान गुरुजींनी हसतमुखाने पेलले. आज त्याचे सकारात्मक परिणाम पहायला मिळत आहेत. आसनामध्ये काही नवे आणि सोपे प्रकार कसे आणता येईल याचाही गुरुजी नेहमी विचार करीत. रोप शिर्षासन हा शिर्षासनाचा एक प्रकार त्यांनीच पुढे आणला. या प्रकारात एका टांगता दोर अडकवून खाली डोके आणि वर पाय अशा स्थितीत शिर्षासन केलेे जाते. एरव्ही जमिनीवर हे आसन करायचे तर दोन्ही हातांवर तसेच डोक्यावरही काही प्रमाणात का होईना ताण येतो. तसा तो येऊ नये या हेतूने रोप शिर्षासनाची संकल्पना समोर आली. आपल्या शरीरावर, मनावर आपले पूर्ण नियंत्रण हवे. तसे झाल्यास कोणतीच गोष्ट कठीण वाटत नाही. त्यासाठीच योगासनांचा अभ्यास गरजेचा ठरतो, असे ते नेहमी सांगत. एकदा अमेरिकेच्या दौर्‍यात गुरुजींनी एका उंच डोंगराच्या कड्याच्या टोकावर शिर्षासन करून दाखवले होते. अर्थात, ते पाहणारे आश्‍चर्याने थक्क झाले होते हे वेगळे सांगावयास नको.
गुरुजींचा प्राणायामाचा अभ्यासही दांडगा होता. त्यामुळे प्राणायाम शिकण्यासाठी अनेकजण गुरुजींकडे येत. परंतु प्राणायाम शिकण्यापूर्वी पुरेशी आसनसाधना व्हावी अशी त्यांची अट असे. एखाद्या गोष्टीत मास्टरकी मिळविल्यावरच पुढच्या गोष्टीकडे वळावे असे त्यांचे मत होते. आसनांच्या माध्यमातून योगसाधना आणि नंतर प्राणायाम याच पध्दतीने अभ्यास केला जावा असा त्यांचा आग्रह असे. आज विविध वाहिन्यांवर आसनांची प्रात्यक्षिके दाखवली जातात. ती पाहून अनेकजण घरी आसने करण्याचा प्रयत्न करतात. परंतु या प्रकाराबद्दल गुरुजींना चीड होती. आसने ही गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करावीत आणि ती गुरू-शिष्य परंपरेतून पुढे यावीत असा त्यांचा आग्रह असे. आसनांचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार यामध्ये गुरुजींनी केलेले कार्य बरेच मोठे आहे. त्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले. योगाभ्यासाद्वारे तुमचे आयुष्य सार्थकी लागेल आणि त्यातच मलाही खर्‍या अर्थाने समाधान प्राप्त होईल, असे ते म्हणत. एवढे मोठे कार्य उभे करूनही गुरुजींना प्रसिध्दीचा हव्यास नव्हता. त्याच बरेाबर कोणत्याही मान-सन्मानाची अपेक्षा नव्हती. त्यांनी स्वत:च्या संस्थेच्या कोठेही शाखा काढल्या नाहीत. प्रत्यक्ष कार्यावर त्यांचा भर होता. त्या ऐवजी अधिक संख्येने लोक योगाभ्यासाकडे कसे वळतील यासाठी प्रयत्न केले.योगप्रसार हाच एक ध्यास उराशी बाळगून गुरुजी प्रयत्नशील राहिले. भारतीय परंपरा, शास्त्र म्हणून योगाची जोपासना केली पाहिजे असा त्यांचा सततचा आग्रह होता. गुरुजींकडे साधनेतून निर्माण झालेली प्रचंड मोठी शक्ती आणि सिध्दी होती. असे असले तरी त्यांनी कधी चमत्कार करून दाखवले नाहीत. महाराज म्हणूनही ते कधी पुढे आले नाहीत. यातच त्यांचे वेगळेपण आणि योगाभ्यासाच्या प्रचारकार्याविषयीची निष्ठा दिसून येते. अशा या अलौकीक व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने योगाभ्यासाच्या क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाला विनम्र आदरांजली