अलक्ष लागले दिवे

0
33
  • – डॉ. अनुजा जोशी

दिवे लागले रे दिवे लागले रे
तमाच्या तळाशी दिवे लागले
ही सुप्रसिद्ध कविता लिहिणारे गोमंतकीय कवी शंकर रामाणी यांचे जून २०२१-२२ हे जन्मशताब्दी वर्ष. हे औचित्य साधून त्यांच्या आत्ममग्न कवितेला त्यांच्या ‘तमाच्या तळाशी’ असलेला हाच ‘उजाळा’ आपण नव्याने देत आहोत.

रामाणींची कविता स्वत:चे अनोखेपण जपते, वेगळा काव्यविषयक विचार करते, वेगळे प्रतिमाविश्व साकारते, प्रादेशिक विविध संदर्भ व निसर्गसंवेदनांच्या नावीन्यपूर्ण नजाकती त्यामध्ये येतात. तरल आत्मिक जाणिवांमधून आलेले तटस्थ जीवनचिंतन व आध्यात्मिक मूल्यजोपासना ही कविता करते. वैशिष्ट्यपूर्ण ऋतुसंवेदनांनी ती नखशिखांत नटली आहे. आशयगर्द नवीन शब्दांच्या जोडण्या- घडवणुका, नवीन संकल्पना, प्रादेशिक बोलीभाषेतले अनेक संदर्भ व प्रत्ययकारी प्रतिमांमधून आविष्कृत होणारी स्वत:ची वेगळी काव्यभाषा ही रामाणींची ‘रमणीय’ काव्यशैली होय.

शंकर पांडुरंग रामाणी यांचा जन्म २६ जून १९२२ रोजी बार्देश तालुक्यातील वेरे या गावी झाला. फोंडा तालुक्यातील वाडी- तळावली हे त्यांचे मूळ गाव. सुसंस्कृत सारस्वत कुटुंब. घरात देवधर्म-भजन-पूजनाचे समृद्ध सांस्कृतिक वातावरण. आईच्या जात्यावरच्या ओव्या, अभंग-गाण्यांचा बराच प्रभाव व मावशीचा प्रेमळ सहवास त्यांना लाभला होता. वडील नदीपरिवहन खात्यात अधिकारीपदी नोकरीला होते. उत्तम वाचक, नाट्यरसिक व तबलावादक होते. मात्र ते बरेच तापट व कडक शिस्तीचे होते. शालेय शिक्षणात रामाणींना तसा फारसा रस नव्हता. रडत-रखडत कसेबसे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले होते! ‘मुदलीच अभ्यासाशी न जुळलेले नाते’, ‘मुदलीच नापीक माती’ हे त्यांनी कवितांमधून स्वत:साठी वापरलेले शब्द आहेत. वयाच्या १४-१५ व्या वर्षीच रामाणी लिहू लागले. शालेय वयापासून कविता जवळ आली खरी, पण वडिलांच्या कडक शिस्तीचे पडसाद मनावर तीव्रतेने पडून बरेच क्लेशकर होऊ लागले होते. त्यांच्या दुराग्रही स्वभावामुळे कोवळ्या कविमनाची घालमेल होऊ लागली होती. आणि यातच १९३९ साली रामाणींची पहिली कविता ‘प्रकाश’ या साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. पुढे ‘किर्लोस्कर’मध्ये एक कविता प्रकाशित होऊन तिचे मानधन म्हणून मनिऑर्डरने आठ आणे आले तेव्हा ‘आज तू आपल्या घराण्याची अब्रू घालवलीस’ असे म्हणून वडील त्यांच्यावर कडाडले होते! शिक्षणात उपद्रवी ठरणारा कवितेचा नाद वडिलांना पटण्यासारखा नाही आणि यांना तर कवितेचे मोरपिस सापडलेले अशी भावविश्वाची फरफट व शिक्षणात अपयश, व्यवहारशून्यता अशा गोष्टींमुळे खूप परवड वाट्याला येत गेली. परिस्थिती बिकट बनत गेली. व्यवहाराने म्हणावे कवितेमुळे परवड झाली व कलंदरीने म्हणावे कवितेने तारू वाचवले, अशी एकूण स्थिती होती!
अशा प्रतिकूलतेमधून वाट काढत, रडत-रखडत कसेबसे मॅट्रिक पदरात पडले व लगेचच वडिलांच्या आज्ञेबरहुकूम त्यांच्याच नदीपरिवहन खात्यात कारकुनाची नोकरी धरावी लागली. पुढे वडिलांच्याच इच्छेनुसार त्यांनी ठरवलेल्या वेळी, ठरवलेल्या मुलीशी लग्न व पणजी परिसरात बिन्हाडू संसार सुरू झाला. तो फार सौख्यकर नाही असा व जेमतेम परिस्थितीतच होता. त्यातच काही वर्षांनी पत्नीचे गंभीर आजारपण उद्भवले व आकस्मिकपणे आजारपणात तिचा दुःखद मृत्यू झाला. तीव्र उदासीची छाया, कौटुंबिक ताणेबाणे- त्यातून वाट काढत उर्वरित वाटेवर सोबतीसाठी म्हणून दुसरा विवाह- द्वितीय पत्नी लीला यांच्याशी मात्र सहजीवनाचा सुखद अनुभव त्यांना मिळाला. पण तोवर परिस्थितीचे भोग कायमचे चिकटलेले. मूळ घरी फारसे वास्तव्य न घडता इथे-तिथे बिर्‍हाडू संसार झाला. सेवानिवृत्तीनंतर तर पत्नीच्या नात्यात, मेहुणीच्या देखरेखीत बेळगाव-शहापूरला आळवण गल्लीत बिन्हाड… अपत्यप्राप्ती नव्हती, तब्बेतीचे सततचे अस्वास्थ्य, कार्यक्षमता खूप कमी, दृष्टी अधू… ही सगळी एक आयुष्यभराची व्यथामालिकाच होती!

कवितेची निर्मितिप्रक्रियाही अजब होती… पत्नीचे गंभीर आजारपण व तातडीची वेळ… १५ जुलै १९७० हा तो दिवस. माझी (प्रथम) पत्नी खूप आजारी होती. तिला हार्टडिसीज तर होताच, पण काही नवीनच आजार उद्भवला होता. तिला खूपच त्रास होऊ लागला. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी ऍम्बुलन्स आणायला आमचा शेजारी गेला. तेव्हा मी त्यांची वाटच पाहत बसलो होतो. आत बायको अक्षरश: तळमळत होती. वेदनांनी ओरडत होती. अत्यंत निराशेचा असा तो क्षण होता. आणि… आणि मला कविता आली! आपोआप आली. त्याचा या घटनेशी संबंध असेल किंवा नसेलही. कुणाला ठाऊक? त्या ओळी मनातून निसटून जाऊ नयेत म्हणून हाताला मिळाला त्या कागदाच्या चिटोर्‍यावर खरडली… ‘दिवे लागले रे, दिवे लागले रे, तमाच्या तळाशी दिवे लागले!’ गाढ अंधारामध्ये ओठावर उष:सूक्त आणणारे हे कोणते पेटते फुलांचे प्राक्तन? हा कसला जलजाळ? हे कोणते गूढ तमाच्या तळीचे दीप…?
‘एकल्याने गावे एकट्याचे गाणे, परक्याचे नाणे खरे खोटे’ असा एकटेपणाचा तीव्र सूर व काळीज हेलावणारी आर्तता रामाणींच्या कवितेला व्यापून राहिली आहे. निरंतर व्यथा-वेदना सोसणार्‍या मनाला रामाणींनी ‘व्यथालय’ म्हटले आहे. ज्या घरामध्ये दुःख कवीच्या कुशीत झोपले आहे अशी एक अनोखी कल्पना ‘अलक्ष लागले दिवे’ या कवितेत दिसते. एका सखोल चिंतनाच्या क्षणी ‘अलक्ष’ दिवे लागल्याच्या आत्मानुभूतीचा हा उद्गार आहे.
तमांत जीव गुंफितां सुदूर विश्व जागलें
तुला न पाहिलें; उरी तुझी प्रकाशपाउलें
नशेत स्वप्न वाहतें : उडून भागले थवे…
व्यथालयांत माझिया अलक्ष लागले दिवे
बहुतांशवेळा निसर्गचित्रांमधून भाव-भावनांचे प्रकटन करणारे एक वेगळे, अनोखे प्रतिमाविश्व हे रामाणींच्या काव्याचे ठळक वैशिष्ट्य. ‘उन्हाचे आरसे झाले’, ‘तीन उन्हाचे दगड ठेविले आणि रांधले जिणे’, ‘सांज दाटली विटकररंगी वत्स उन्हाचे अंग चाटते श्रांत धरेचे’, ‘चमचाभर जीणे जगताना’, ‘अपंगाला लाडकी लेक तशी उत्तरेला एक थोटी खिडकी’, ‘वैशाखातच मी गं लावल्या उन्हाच्या लखलखत्या बागा’, ‘माझिया दारात चिमण्या आल्या’, अशा एक सो एक प्रतिमांच्या पदन्यासाने रामाणींची कविता सजली, नटली आहे. निराकाराचे झाड, चेतनेचे मोर, निळे तंद्रीचे उखाणे, मनामनाची मुकुंदमिठी, मी-तू च्या मधे झुलणारा आहे- नाहीचा हिंदोळा, पंखाना झालेला गगनडंख, झंझाळ झडीचा हुल्लड आषाढ, काळजाचे घर लोण्याहून मऊ अशा मनसुंदर रम्य कल्पनांनी ही कविता देखणी व आशयघन झाली आहे.
आयुष्यात दाटलेला काळोख इथे वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगवेगळ्या छटांमध्ये कवितेत येतो. काळोखाचे कावळे दु:खाचे कर्कश रूप दाखवतात. अंधाराची स्तने, काळखाचा काटा, काळोखाचा क्रूस, काळोखाचे काळवीट, काळे कावळे मांजर अशा काळोखप्रतिमा येतात. काळोखाच्या डोळ्यातून ‘प्रकाशाचे रडे’ येते. चित्र-विचित्रांनी नटलेला काळोख उजेडाचे दान पदरात टाकतो ही सकारात्मकता महत्त्वाची!

सुख, समाधान, सार्थक, संतोष, साक्षात्कार अशा अनेक आत्मिक जाणिवांचा तरल काव्यात्म आविष्कार म्हणजेच आध्यात्मिक अंगाने जीवनाचा संतुलित विचार रामाणींनी कवितेत केला. त्यांच्या कवितेतील ही आध्यात्मिकता मराठी कवितेत वेगळी व वैशिष्ट्‌यपूर्ण ठरते.

‘ऐन तापत्रयी भर्जरली काया, अत्तरला फाया वेदनेचा’, ‘मला अभाग्याला घडे अज्ञाताचा अभिषेक’ असा सोसण्यापासून सार्थकापर्यंतचा जीवनप्रवास कवितेतून झालेला दिसतो. दु:खाची अटळ अपरिहार्यता स्वीकारून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सकारात्मकतेने शोधावा लागतो. आंतरिक बळाने त्या दु:खाचा सामना करावा लागतो. हे सारे कवितेत वेगवेगळ्या पद्धतीने येते. आपल्याच वाट्याला हे का आले याचा शोक करत न राहता ‘लक्ष वेदनांच्या पुण्याईचे बळ पंखातून कळ आकाशाची’ याप्रमाणे दु:खातून बाहेर पडण्याची आस कवितेत येते. शिवाय दु:ख, व्यथा, वेदना ही उद्वेगाने न सोसता सात्त्विकभावाने इथे सोसलेली दिसते. ‘पोळलेल्या पावलांची आपसूक झाली वीट’ असे म्हणताना पोळल्या पावलांच्या या विटेवर ईश्वराने क्षणभर तरी उभे राहावे व आयुष्याच्या रणरणीला विश्राम मिळावा अशी संयत व सात्त्विक भावना येते.

ताणतणाव झेलण्याकरिता, चित्त व चित्तवृत्ती प्रसन्न राहण्याकरिता क्षणभराच्या विसाव्याशी मनाचा ‘सं-योग’ आवश्यक आहे. रामाणींची कविता नेमकी इथेच कामी येते. चार ‘हिरव्या हिरव्यागार हुरमुजी’ शब्दांच्या नि दोन ‘अलक्ष कळांच्या’ दिल् बहार ओळींमध्ये ती रणरणत्या मनाला हाच ‘पांचवाकंच’ विसाव्याचा क्षण देऊ शकते. मनाचा असीम शांततेशी, सत्त्विकतेशी ‘सम्यक योग’ जोडून देते! ‘पोळलेले पुण्य गळामिठी घाली/ पुंडलिका भेटी परब्रम्ह’ किंवा ‘अनंताची मिठी रोमरोमी’ अशा आत्मिक समाधानाच्या शब्दांनी ती अंतर्बाह्य कोलाहलाशी सुसंवाद करते. त्यातून सुटण्याचे तरल मार्ग दाखवते. ‘तीव्र वैशाखाच्या् झळा ग्रीष्म झाले रोमरोम/ कधीतरी पाझरावे गर्द आषाढात् व्योम’ अशी निर्झरनिर्मळ आस निर्माण करते. गाढ आत्मतंद्रीतून फुलणारे असे असंख्य अलवार क्षण या कवितेत गवसतात. ‘जीण वेचता वेचता किती ओंजळीत फुले/ वारे वादळ सोसून झाड अष्टांगी मोहरे’ अशी उत्कट हळवी फुले ही कविता पदरी टाकते. ‘ऊन सोसुनी असे मनात काय माळिले/उष्ण ओंजळीतुनी सुगंध सर्व सांडले’ ही भावात्मकता व अंतिम समाधान आयुष्याला लाभायला हवी तर रामाणींच्या कवितेजवळ क्षणभर थांबायला हवे!

एकनिष्ठ काव्यसाधनेचे व्रत रामाणींनी जीवनव्रत म्हणूनच श्रद्धेने जोपासले. त्या गाढ आत्मतंद्रीमध्ये हा ‘काळोखाचा कवी’ आयुष्यभर तल्लीन राहिला. त्यांच्या कवितेला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात पुन्हा एकवार उजाळा मिळून ‘तमाच्या तळाशी दिवे’ लागण्याचा प्रत्यय मराठी रसिक पुन्हा एकदा नव्याने घेतो आहे व या कवितेचे ज्येष्ठ प्रातिनिधिक मूल्य पुन:स्थापित होते आहे ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे.