- भूषण ओक
भारतीय शेअर बाजार सध्या प्रचंड तेजीत आहे आणि रोज नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. कोविडनंतर मोठ्या संख्येने बाजारात उतरलेले किरकोळ गुंतवणूकदार, नियंत्रणात असलेला महागाई वाढीचा दर, कंपन्यांचे उत्तम निकाल, भारताची सुदृढ अर्थव्यवस्था आणि ‘जीडीपी’मध्ये अपेक्षित असलेली भरघोस वाढ ही या तेजीची कारणे आहेत. एकूण हा अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा आहे.
अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 2024-25 सालचा अंतरिम अर्थसंकल्प नुकताच सादर केला. आगामी निवडणुकांमुळे या अर्थसंकल्पात खूप महत्त्वाच्या घोषणा अपेक्षित नव्हत्या. तरीही अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधा, विशेषतः रेल्वे आणि विमानतळ, तसेच पर्यायी आणि नूतनीकरणीय ऊर्जाक्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्याचप्रमाणे मध्यमवर्गासाठी दोन लाख नवीन घरबांधणीची घोषणा केली आहे. ही तिन्ही सरकारची प्राधान्य क्षेत्रे आहेत; आणि जुलै महिन्यातील नवीन सरकारच्या अर्थसंकल्पात या तिन्ही क्षेत्रांसाठी भरघोस तरतूद होईल यात शंका नाही. संरक्षण क्षेत्राबाबत अर्थमंत्र्यांनी यावेळी काही घोषणा केली नाही, पण तेही सरकारचे प्राधान्य क्षेत्र आहे आणि त्यातही चांगली तरतूद होईल.
या तिन्ही क्षेत्रांमधील कंपन्या आणि त्याचबरोबर या सर्व प्रकल्पांसाठी लागणारा पैसा पुरवणाऱ्या वित्तीय संस्था यांच्या समभागांमध्ये आणखी तेजी बघायला मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा सर्वप्रथम वित्त संस्थांचा विचार करू.
वित्तीय कंपन्या : सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा, पर्यायी आणि नूतनीकरणीय इंधने, रसायने, ऑटोमोबाईल आणि संरक्षण प्रकल्पांना भरपूर प्रमाणात निधीची आवश्यकता असते. महागाईदर कमी राहिला तर रिझर्व्ह बँकेचे व्याजदर आणि पर्यायाने बँका आणि इतर वित्तसंस्थांचे व्याजदर कमी असतील. खूप कंपन्यांना सरकारी कंत्राटे मिळाली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाची जोखीम आणि पर्यायाने बँका आणि इतर वित्तसंस्थांची जोखीम कमी असेल.
अर्थव्यवस्थेच्या सुदृढ वाढीत बँका आणि इतर वित्तसंस्था नेहमी आघाडीवर असतात. त्यामुळे येणारी दोन वर्षे तरी या कंपन्यांचे समभाग उत्तम परतावा देऊन जातील. पुन्हा येथे वाजवी मूल्यांकनातच खरेदी करावी. यामध्ये कित्येक सरकारी, खाजगी बँका व वित्तसंस्थांचा विचार अवश्य करावा. करूर वैश्य बँक, आयडीएफसी फर्स्ट, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक इत्यादी बँका आणि बजाज फायनान्स, कॅनफिन होम्स, पॉवर फायनान्स यांसारख्या वित्तसंस्थांचा गुंतवणूकदारांनी अभ्यास करावा.
पायाभूत सुविधा : 2019 पासून पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सरकारने खूप गुंतवणूक केली आहे. या अर्थसंकल्पातही आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे 11.1 लाख कोटींची तरतूद या क्षेत्रासाठी केली आहे. त्याअंतर्गत रेल्वेसुद्धा सरकारचे प्राधान्य क्षेत्र आहे. त्यामुळे बांधणी (कंस्ट्रक्शन), रेल्वे आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांतल्या कंपन्या चांगली प्रगती करतील असे वाटते. या गुंतवणुकीचा फायदा पुरवठा आणि दळणवळण (सप्लाय अँड लॉजिस्टिक्स) या क्षेत्रातल्या कंपन्यांना होईल.
या क्षेत्रांतील सर्वच कंपन्यांचे भाव सध्या आकाशाला भिडले आहेत. गुंतवणूकदारांनी आरव्हीएनएल, राईट्स, टिटागढ वॅगन्स, जुपिटर वॅगन्स, आयआरसीटीसी, रेलटेल, कंटेनर कॉर्प, भेल यांसारख्या मूलभूतरीत्या मजबूत रेल्वेशी संबंधित कंपन्यांवर लक्ष ठेवावे आणि किमती उतरण्याची वाट पाहावी.
पर्यायी आणि नूतनीकरणीय ऊर्जा : या क्षेत्रात निवेशकांनी या क्षेत्रातील टाटा पॉवर, आयआरईडीए, बोरोसिल रिन्युएबल्स, वारी रिन्युएबल्स, जेनसोल, केपीआय ग्रीन, अडाणी ग्रीन यांसारख्या कंपन्यांकडे लक्ष ठेवावे.
पर्यायी आणि नूतनीकरणीय ऊर्जाक्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचा फायदा ऑटो क्षेत्रालाही होईल. वाढती अर्थव्यवस्था उपभोगाच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी मदत करते, त्यामुळे या क्षेत्रातल्या (कंझमशन बेस्ड) कंपन्यांनासुद्धा मदत मिळेल. आताच चारचाकी आणि दुचाकी, विशेषतः चारचाकी गाड्या मिळण्यासाठी प्रतीक्षाकाळ सहा महिन्यांवर आहे. ऑटोमोबाइलच्या क्षेत्रात विद्युत गाड्यांच्या संख्येत खूप वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारचे धोरणही याला अनुकूल आहे. पण या क्षेत्रात कुठल्या कंपन्या बाजी मारतील आणि इंधन वीज असेल की इथेनॉल असेल की ग्रीन हायड्रोजन असेल हे आत्ता सांगणे कठीण आहे. त्यामुळे या क्षेत्रातली गुंतवणूक या क्षेत्राला पूरक म्हणजे गाड्यांचे सुटे भाग पुरवणाऱ्या (ऑटो न्सिलरी) कंपन्यांमध्ये करणे इष्ट राहील. यालाच पिक अँड शॉवेल प्ले किंवा प्रॉक्सी प्ले असेही म्हणतात.
घरबांधणी : घरबांधणीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा बांधणीमालाच्या म्हणजे स्टील, सिमेंट, हार्डबोर्डस बनवणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष द्यावे. याला ‘प्रॉक्सी प्ले’ असेही म्हणतात. पुरवठा आणि दळणवळणाच्या ब्ल्यूडार्ट, टायगर लॉजिस्टिक्स, अलकार्गो, ट्रान्सपोर्ट कॉर्प याही कंपन्यांकडे लक्ष असू द्यावे.
भारतीय शेअर बाजार सध्या प्रचंड तेजीत आहे आणि रोज नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. कोविडनंतर मोठ्या संख्येने बाजारात उतरलेले किरकोळ गुंतवणूकदार, नियंत्रणात असलेला महागाई वाढीचा दर, कंपन्यांचे उत्तम निकाल, भारताची सुदृढ अर्थव्यवस्था आणि जीडीपीमध्ये अपेक्षित असलेली भरघोस वाढ, फेड्स म्हणजे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर न वाढवण्याचा घेतलेला निर्णय आणि आगामी वर्षात व्याजदर कमी करण्याचेही संकेत, खनिज तेलाच्या नियंत्रणात असलेल्या किमती आणि चीनला पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून भारताला प्राधान्य ही या तेजीची कारणे आहेत. कालच ‘आयएमएफ’ने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग येत्या वर्षासाठी 6.3 वरून वाढून 6.7 होईल असे भाकित केले आहे. सीतारामन यांचा अर्थसंकल्प या वाढीला आणि त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या सरकारी भांडवली तरतुदीला पाठबळ देणारा आहे.
बाकी अर्थव्यवस्थेच्या वाढीवर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रांचा विचार केला तर आयटी क्षेत्राची प्रगती खूप प्रमाणात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. पण तरीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि मशीन लर्निंग या क्षेत्रात पुढे असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक चांगला परतावा देऊन जाईल.
रसायन (केमिकल्स) क्षेत्र सध्या बाजाराच्या गैरमर्जीत आहे. पण चीनमधून बाकी ठिकाणी स्थलांतर करण्याच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या धोरणाचा (चायना वन फॅक्टर) भारतीय कंपन्यांना फायदा नक्कीच होणार. जवळजवळ सर्वच क्षेत्रे चक्रीय (सायक्लिकल) पद्धतीने वाटचाल करतात आणि त्यामुळे सध्या न चालणाऱ्या क्षेत्रातली गुंतवणूक (कॉन्ट्रॅरियन इन्व्हेस्टमेंट) दीर्घ मुदतीत चांगला फायदा देते.
सगळ्याच कंपन्यांचे मूल्यांकन सध्या निवेशासाठी पोषक नाही. उत्तम कंपनीचा अतिमहाग शेअर आणि खराब कंपनीचा खूप स्वस्त शेअर या दोहोपासून दूर राहणे नेहमीच उत्तम.