अर्थसंकल्प व मतमोजणी पुढे ढकला

0
86

>> विरोधी पक्षनेत्यांचे राज्यपालांना निवेदन, निवडणूक आयुक्तांकडे मागणी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भेट घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अर्थसंकल्प तसेच पालिकांची मतमोजणी पुढे ढकलण्याची मागणी करणारे निवेदन काल सादर केले.

राज्यपाल कोश्यारी यांनी अधिवेशनप्रश्‍नी लक्ष घालण्याचे आश्‍वासन विरोधी पक्षांच्या आमदारांना दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
गोवा विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत विरोधी गटाच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केवळ लेखानुदान संमत करून पुढे ढकलण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने विरोधी आमदारांची ही मागणी फेटाळून लावली. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज नियमानुसार घेऊन २४ मार्चला अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केला आहे.

विधानसभेचे अधिवेशन निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर घेतले जाणार होते. तथापि, पाच नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेच्या काळात अधिवेशन घेणे योग्य नसल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे, असे कामत यांनी सांगितले. यावेळी मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई, आमदार प्रसाद गावकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांची उपस्थिती होती.

मतमोजणी एकत्रित करा
राज्यातील विरोधी आमदारांच्या एका शिष्टमंडळाने नूतन राज्य निवडणूक आयुक्त रमणमूर्ती यांची भेट घेऊन सर्व नगरपालिका निवडणुकीतील मतमोजणी एकाच वेळी करण्याची मागणी केली.
पहिल्या टप्प्यात सहा नगरपालिका आणि पणजी महानगरपालिकेसाठी निवडणूक मतदान होत आहे. या निवडणुकीतील मतमोजणी २२ मार्चला करू नये. तर, शिल्लक पाच नगरपालिकांतील निवडणूक मतदान घेण्यात आल्यानंतर सर्वांची एकत्रित मतमोजणी करावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयुक्ताकडे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.