अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवू

0
1

>> कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

आगामी मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचे दिवस वाढविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना दिले आहे, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
गोवा विधानसभेच्या येत्या 6 व 7 फेब्रुवारीला होणाऱ्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या कामकाजावर विचारविनिमय करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक काल सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

गोवा सरकारने आगामी अधिवेशन केवळ दोन दिवसांसाठी बोलावले असून, ते 6 व 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांचा त्याला विरोध असून, अधिवेशनाचे दिवस वाढवण्यात यावेत अशी त्यांची मागणी आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचे दिवस वाढविण्याचे आश्वासन दिले आहे.

या बैठकीत दोन दिवसांच्या अधिवेशनावर चर्चा करून कामकाज निश्चित करण्यात आले. या अधिवेशनात पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे, अशी माहिती तवडकर यांनी दिली.

या बैठकीत विरोधी पक्षांतील आमदारांनी अधिवेशनाचे कामकाज केवळ दोन दिवसांचे ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी त्यांनी केली. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचे दिवस वाढविण्यात येतील, असे आश्वासन विरोधी पक्षांच्या आमदारांना दिले, असे तवडकर यांनी सांगितले.

विरोधी पक्षांच्या आमदारांची संयुक्त बैठक

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या अध्यक्षतेखाली काल काँग्रेस, आम आदमी पक्ष व गोवा फॉरवर्ड या पक्षांच्या आमदारांची एक बैठक काल पर्वरी येथे विधानसभा संकुलात झाली. यावेळी विरोधी आमदारांनी फेब्रुवारी महिन्यातील अधिवेशनात सरकारला कोणकोणत्या मुद्द्यावरून कोंडीत पकडावे याबाबत सविस्तरपणे चर्चा करतानाच डावपेचांची आखणी केली.

या अधिवेशनात सरकारला म्हादई जलतंटा, राज्यातील वाढती बेरोजगारी व ती दूर करण्यात सरकारला आलेले अपयश, तसेच सरकारी नोकऱ्यांसाठी झालेला भ्रष्टाचार व अन्य कित्येक छोट्या-मोठ्या प्रश्नांवरून सरकारला कसे उघडे पाडता येईल यावर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीला युरी ओलमाव यांच्याबरोबरच काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फेरेरा, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा व गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे उपस्थित होते.