अर्थसंकल्पातून केवळ बिहार, आंध्रच सुखी

0
9

>> विरोधकांचा आरोप; संसदेबाहेर अर्थसंकल्पाविरोधात निदर्शने

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा काल तिसरा दिवस होता. बुधवारी सकाळी सभागृह सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेत्यांनी संसदेबाहेर केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात निदर्शने केली. या अर्थसंकल्पातून 90 टक्के देश गायब आहे. केवळ बिहार आणि आंध्र प्रदेशलाच सुखी केले आहे, कारण केंद्र सरकार त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या जोरावर चालवले जात आहे. हे ‘मोदी सरकार बचाओ बजेट’ आहे, अशी टीका विरोधकांनी यावेळी केली.

काल लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहातही अर्थसंकल्पावर गदारोळ झाला. विरोधकांनी हा अर्थसंकल्प पक्षपाती स्वरूपाचा आणि दोन राज्यांना झुकते माप देणारा असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला चर्चेदरम्यान विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
या आरोपांवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्तर दिले. अर्थसंकल्पात सर्व राज्यांची नावे घेणे शक्य नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांचे नेते जाणीवपूर्वक असे आरोप करत आहेत जेणेकरून लोकांना आपल्या राज्याला काही मिळाले नाही असे वाटेल, हे योग्य नाही, असे अर्थमंत्री म्हणाल्या.