>> मनोहर पर्रीकर गोवा ग्रँडमास्टर खुली ‘ब’ गट ऑनलाईन बुद्धिबळ
अर्जेंटिनाच्या लाझारी सर्जिओने (१९२३ रेटिंग) मनोहर पर्रीकर स्मृती गोवा ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय खुली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘ब’ गटाचे जेतेपद प्राप्त केले.
स्पर्धेत एकूण भारतातील व भारताबाहेरील इलो रेटिंग २००० व त्याखालील ३२० स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता. त्यात भारताबरोबरच अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिकेतील बुद्धिबळपटूंचा समावेश होता. लाझारी सर्जिओने १३ सामन्यांतून ११.५ गुणांसह सरस टायब्रेकवर या स्पर्धेचे अजिंक्यपद प्राप्त केले. अर्जेंटिनाच्याच गार्सिया गोंझालोने (१७१७) ११.५ गुणांसह उपविजेतेपद तर कर्नाटकाच्या शरण राव (१९९२) याने ११.५ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त केले.
गोमंतकीय खेळाडूंत एआयएम विल्सन क्रुझ (१८१५) याने ९.५ गुणांसह नववे. एआयए इथान वाझने (१३८४) ८.५ गुणांसह २० तर अनिरुद्ध भटने (१९०८) ८.५ गुणांसह २३वे स्थान मिळविले.
गोव्याचे अन्य बुद्धिबळपटू शेन ब्रागांझा (९.५ गुण), देवेश नाईक (८.५ गुण), दत्ता कांबळी (८.५ गुण) यांनी गोव्याचे उत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून तर सयुरी नाईक (८.५ गुण), तन्वी हडकोणकर (८ गुण) आणि श्रीलक्ष्मी कामत (८ गुण) यांनी गोव्याच्या उत्कृष्ट खेळाडू म्हणून महिला विभागात अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त केले.
खुल्या गटात गोव्याच्या साईरुद्रा नागवेकर आणि यश उपाध्ये यांनी उत्कृष्ट इलो १४०१ ते १६०० विभागात अनुक्रमे ४थे व ५वे स्थान मिळविले. आयुष शिरोडकरने १५ वर्षांखालील गटात ५वे तर जॉय काकोडकरने १२ वर्षांखालील गटात ४थे स्थान प्राप्त केले.
रुबेन कुलासो आणि आलेक्स सीक्वेरा यांनी गाव्या पुरुष गटात अनुक्रमे ४थे व ५वे स्थान तर महिला विभागात डब्ल्यूसीएम गुंजल चोपडेकर व निधी गावडेने अनुक्रमे ४थे व ५वे स्थान मिळविले.
अ, ब, क, ड, ई अशा पाच गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यापैकी ब आणि क गटातील स्पर्धा झालेल्या आहेत.