अरुण योगीराज यांनी साकारलेल्या सुरेख मूर्तीची राम मंदिरासाठी निवड

0
25

>> श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अधिकृत घोषणा

अयोध्येत साकारलेल्या भव्य राम मंदिरासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी याची अधिकृत घोषणा केली. या मूर्तीचे वजन 150 ते 200 किलो असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सोमवार दि. 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठानेचा विधी संपन्न होणार आहे.

अरुण योगीराज यांनी केदारनाथ येथे शंकराचार्यांची आणि इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती उभारली आहे. मंदिरात रामाची जी मूर्ती स्थापित केली जाणार आहे, ते बाल्यावस्थेतील श्रीराम आहेत. राम मंदिरासाठी तीन मूर्तीकारांनी रामलल्लाची मूर्ती बनवली होती. त्यापैकी अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची अंतिम निवड केली आहे, असे चंपत राय यांनी सांगितले. इतके दिवस ज्या मूर्तीची पूजा केली जात होती, त्याचे काय होणार, असा प्रश्न विचारला असता, जुनी मूर्ती मंदिराच्या आवारातच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले भव्य राम मंदिरातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठपनेचा पूजाविधी बुधवारपासून सुरू होणार असून, तो 21 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 22 जानेवारी रोजी गाभाऱ्यातील मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल.