अरुणाचलमध्ये घुसखोरी करताना चीनी सैनिकांना भारताने रोखले

0
33

अरुणाचल प्रदेशात यांगत्सेजवळ तवांग सेक्टरमध्ये गेल्या आठवड्यात भारतीय सैनिकांनी चीनच्या जवळपास २०० सैनिकांना घुसखोरी करताना रोखले. भारतीय सेनेच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चीनी सैनिक वास्तविक नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सीमेत घुसत होते. तेव्हा त्यांना भारतीय जवानांनी रोखले.

त्यामुळे आता अरुणाचल प्रदेशातही भारत आणि चीनचे सैनिक आमने सामने आले आहेत. वास्तविक नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर उभे ठाकले. कमांडर स्तरावर याबाबत चर्चा सुरू आहे.

पूर्व लडाख भागात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून भारत आणि चीन सीमेवर तणाव आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी या भागात सतत सैन्य स्तरावर चर्चा सुरू आहे. या भागात एलएसीवर चिनी सैनिकांनी आपली संख्याही वाढवल्याचे समोर आले आहे.

उत्तराखंडातही तणाव
या अगोदर ३० ऑगस्ट रोजी उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चीनच्या जवळपास १०० सैनिकांनी सीमारेषा पार करून भारतीय क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय सीमेपासून जवळपास पाच किलोमीटर भारतीय हद्दीत येऊन पूल उद्ध्वस्त करून चीनी सैनिक परतले होते, अशी माहिती समोर आली होती. परंतु, सुरक्षा यंत्रणेने हा दावा फेटाळून लावला होता.