>> कथित अबकारी धोरण घोटाळा प्रकरण; 56 प्रश्नांची सरबत्ती
कथित अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावल्यानंतर काल ते चौकशीसाठी राजधानी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात दाखल झाले. काल दिवसभरात तब्बल 9 तास त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांना सीबीआय अधिकाऱ्यांनी 56 प्रश्न विचारले. रात्री 9 च्या सुमारास ते सीबीआय मुख्यालयातून बाहेर पडले.
शुक्रवारी सीबीआयने या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावत रविवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार काल ते चौकशीसाठी हजर झाले. यावेळी सीबीआय मुख्यालयाबाहेर 1 हजारांहून अधिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. तसेच 144 कलम देखील लागू करण्यात आले होते.
चौकशीच्या पार्श्वभूमीवर आपच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सीबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलनाचा प्रयत्न केला; मात्र दिल्ली पोलिसांनी सर्व आप नेत्यांना ताब्यात घेतले. खासदार संजय सिंह, आतिशी, सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा आणि पंजाब आणि सर्व दिल्ली सरकारच्या इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ताब्यात घेण्यात आले.