>> मुख्यमंत्री; मुंबईतील गोवा भवनाचे काम पूर्ण; 8 ऑगस्टपासून बुकिंग सुरू
मुंबईतील गोवा भवनाचे काम पूर्ण झाले असून, येत्या 8 ऑगस्टपासून बुकिंग सुरू केले जाणार आहे. नवी दिल्ली येथील गोवा सदन इमारत जमीनदोस्त करून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच, अयोध्येत राम निवास बांधण्याचा विचार सुरू असून, 4 हजार चौरस मीटर जमीन उपलब्ध करण्याची विनंती उत्तरप्रदेश सरकारला करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत सामान्य प्रशासन, अबकारी व इतर खात्यांच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.
हुर्राकला जीआय मानांकन मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पेडणे अबकारी कार्यालयातील गैरव्यवहार प्रकरणाचा तपास एसीबीकडून केला जात आहे. गैरव्यवहारातील पूर्ण रक्कम वसुल करण्यात आली आहे. अबकारी खात्याच्या महसूल 900 कोटी एवढा असून, त्यात सुमारे 34 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
प्रशासन स्तंभ या सरकारी इमारतीची जागा अजूनपर्यंत निश्चित झालेली नाही. पाटो-पणजी येथे प्रशासन स्तंभ ही सरकारी इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते; तथापि, जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने जागेच्या विषयावर चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय झालेला नाही, असेही मुख्यमंत्री
म्हणाले.
विरोधकांचा सभात्याग
मोपा विमातळावरील एका मद्यालयाबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहा लावून धरली; मात्र त्याबाबत योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने विरोधी आमदारांनी सभापतींच्या समोरील हौदात येऊन मोपा विमातळावर मद्यविक्री दुकानाला मान्यता देऊ नये, अशी मागणी लावून धरली. मागणीची दखल घेतली जात नसल्याने विरोधकांनी अखेर सभात्याग केला.