अमेरिकेतील ‘हवाई’ राज्याशी सामंजस्य करारास गोवा मंत्रिमंडळाची मान्यता

0
105

अमेरिकेतील हवाई या बंदर राज्याबरोबर व्यापार, पर्यटन, उद्योगासह अन्य विविध क्षेत्रांतील देवाणघेवाणीसाठी सामंजस्य करार करण्यास गोवा मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. तसेच वयोवृद्ध व पूर्णपणे दिव्यांग असलेल्या तीन कैद्यांची सुटका करण्यासही मंत्रिमंडळाने काल मान्यता दिल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. हवाई या राज्याबरोबरील करारात व्यापार, पर्यटन, क्रीडा, विज्ञान, फार्मास्युटिकल, काजू फेणी उद्योग, शिक्षण, योग, आयुर्वेद, औषधी झाडे, हस्तकला, कुशलता विकास, शेती, मत्स्य उद्योग, कला आणि संस्कृती या क्षेत्रांचा समावेश असेल.
खरे म्हणजे यापूर्वीच हा समझोता करार होणार होता. मात्र, हवाई राज्यात अचानक भडकलेल्या ज्वालामुखीमुळे हे काम अडून राहिले. असे पर्रीकर म्हणाले.

आता मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याने हा समझोता करार करण्याच्या कामाला आता गती मिळणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. या करारानंतर दोन्ही राज्ये जुळी राज्ये ठरणार आहेत. गोव्याने एखाद्या राज्याबरोबर असा करार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गोव्याने शहराबरोबर मात्र तसा करार यापूर्वी केलेला आहे, असे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

तीन कैद्यांना मुक्त
करण्याचा निर्णय
जास्त वय असलेल्या व कमीत कमी शिक्षा भोगलेल्या काही कैद्यांची मुक्तता केली जावी अशी मागणी काही लोकांकडून होऊ लागली होती. त्या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत एका वयोवृद्ध कैद्यासह तीन ज्येष्ठ नागरिक असलेल्या कैद्यांची तुरुंगातून मुक्तता करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सुटका करण्यात आलेल्या कैद्यांत रघुनाथ नाईक (९१), मारियो डिसिल्वा व शिवय्या मरिहल या पूर्णपणे दिव्यांग असलेल्या व्यक्तीचा समावेश आहे.

कर्करोग विभागासाठी
अनुपमा बोरकर
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जो कर्करोग विभाग सुरू करण्यात येणार आहे त्या विभागासाठी तज्ज्ञ डॉक्टर म्हणून अनुपमा बोरकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे पर्रीकर म्हणाले.

वीज खाते मुख्यमंत्री
स्वतः जवळ ठेवणार
वीजमंत्री पांडुरंग मडकईकर हे आजारी असल्याने वीज खात्याचा ताबा आपण स्वतः जवळ ठेवणार आहे, अशी माहिती संबंधित प्रश्‍नावर पर्रीकर यांनी दिली. वीज खाते महत्त्वाचे असल्याने या खात्याकडे बारीक लक्ष असायचे, असे ते म्हणाले. सध्या वीजेसंबंधीच्या सगळ्या फाईल्स आपणच हाताळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.