अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आज निवडणूक

0
5

अमेरिकेमध्ये मंगळवार दि. 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणूक होणार आहे. तसेच अमेरिकी काँग्रेसमधील सेनेट आणि प्रतिनिधीगृहातील काही जागांसाठीही मतदान होत आहे. अमेरिकाच नव्हे, तर साऱ्या जगाचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपणच जिंकणार, असा दावा केला आहे.

रिपब्लिक
जो बायडेन यांनी माघार घेतल्यामुळे कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाने ऐनवेळी उमेदवारी दिली; पण तरीही ट्रम्प आणि हॅरिस यांच्यात अभूतपूर्व चुरस आहे. दोघांनाही बहुतेक सर्व जनमत चाचण्यांनी विजयाची समसमान संधी दिली आहे. अध्यक्षपदाची ही निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. कमला हॅरिस निवडून आल्या, तर त्या अध्यक्ष म्हणून निवडून येणाऱ्या पहिल्या महिला ठरतील. अमेरिकेचे पहिले गौरेतर अध्यक्ष बनण्याचा मान बराक ओबामा यांनी यापूर्वीच मिळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प निवडून आले, तर ते या पदावर निवडून येणारे सर्वांत वयस्कर अध्यक्ष ठरतील.

50 राज्ये आणि वॉशिंग्टन डीसीमधील मतदार अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी मतदान करतात; पण ही निवड थेट नसते. प्रत्येक राज्यात दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी किंवा इलेक्टर असतात. त्यांची संख्या ठरलेली असते. एकूण 538 प्रातिनिधिक किंवा इलेक्टोरल मते असतात. त्यात 270 मते मिळवणारा उमेदवार विजयी होणार आहे. दोन्ही उमेदवारांना 269 मते मिळाली, तर अमेरिकी काँग्रेसच्या प्रतिनिधिगृहातील विद्यमान संख्याबळानुसार अधिक जागा असलेल्या पक्षाचा उमेदवार विजयी ठरवला जाणार आहे.

सध्याच्या गणितानुसार डमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांना 226 इलोक्टोरल आणि ट्रम्प यांना 219 इलेक्टोरल मते मिळतील हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे हॅरिस यांना 44 आणि ट्रम्प यांना 51 मतांची गरज आहे. त्यासाठी पेनसिल्वेनिया (19), व्हिस्कॉन्सिन (10), मिशिगन (15), जॉर्जिया (16), नॉर्थ कॅरोलिना (16), ॲरिझोना (11) आणि नेवाडा (6) ही 93 मते निर्णायक ठरणार आहेत.