पश्चिम आशियामध्ये प्रचंड तणावाची स्थिती असताना ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याचे संकेत मिळत आहेत. इराणच्या तीन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी इस्रायलवर हल्ला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश सैन्याला दिले आहेत. इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानाची माहिती खामेनी यांनी गेल्या आठवड्यात देण्यात आली होती. 1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्राला प्रत्युत्तर देताना इस्रायलने इराणच्या लष्करी ठाण्यांना अचूक लक्ष्य केले होते. जर या हल्ल्याकडे दुर्लक्ष केले, तर इस्रायलविरोधात पराभव मान्य केल्यासारखे होईल, असे खामेनी म्हणाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर इराण इस्रायलवर आक्रमण करण्याची शक्यता असल्याचे वृत्त इराणच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.
गेल्या आठवड्यातील या हल्ल्या-प्रतिहल्ल्यानंतर अमेरिकेसह अन्य देशांनी इस्रायल व इराण या दोन्ही देशांना आता पुन्हा हल्ले करू नका अशी विनंती केली होती. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी, आत्तापर्यंत दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेले हल्ले शेवटचे ठरावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुका 5 नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यानंतर इराण इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. यापूर्वी खामेनी यांचे अत्यंत नजीकचे सहकारी मोहम्मद गोलपायेगनी यांनी इस्रायलला पश्चात्ताप होईल असे प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा
दिला होता.