अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर गोळीबार

0
6

>> कानाला गोळी लागल्याने रक्तस्राव

>> गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा मृत्यू

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीदरम्यान झालेल्या गोळीबारात त्यांच्या उजव्या कानावर गोळी लागली आहे, मात्र ते सुरक्षित आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली. त्यावेळी अमेरिकेत शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजले होते. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील बटलर शहरात ट्रम्प निवडणूक रॅली घेत होते. ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली असून थॉमस क्रूक्स हा अवघा 20 वर्षीय तरुण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करताच क्षणी सीक्रेट सर्व्हिसच्या सदस्यांनी प्रतिहल्ला केला. या प्रतिहल्ल्यात थॉम मॅथ्यू क्रूक्सचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामागचा त्याचा हेतू कोणता याबाबत पोलीस शोध घेत आहेत.

शनिवारी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) एजंटने पत्रकार परिषदेत हल्लेखोराची कोणतीही ओळख नव्हती. त्यामुळे त्याची डीएनए चाचणी करण्यात येईल.

हल्ल्याचा हेतू अस्पष्ट
बटलर फार्म शो मैदानावरील स्टेजपासून 100 मीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या एका मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या छतावर क्रूक्स लपून बसला होता. क्रूक्सकडून नंतर एआर शैलीतील रायफल जप्त करण्यात आली आहे. या हल्ल्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली याप्रकरणाची चौकशी होणार आहे.

यापूर्वी तीन अध्यक्षांच्या हत्येचा झाला होता प्रयत्न
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत माथेफिरूंकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. राष्ट्राध्यक्ष, माजी राष्ट्राध्यक्ष आणि पक्षाच्या अध्यक्षपदाच्या प्रमुख उमेदवारांना लक्ष्य करून राजकीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अब्राहम लिंकन यांच्यासह चार अध्यक्षांची हत्या, तर तीन अध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आले.

बटलर शहरातील प्रचारसभेवेळी गोळीबार

प्रचारसभेत गोळीबाराचा चारवेळा आवाज आला असल्याचे एका समर्थकाने सांगितले. त्यामुळे गोळीबाराचा आवाज येताच सगळेजण खाली वाकले. यात ट्रम्प यांचादेखील समावेश होता. तेही लगेच खाली वाकले. मग सीक्रेट सर्व्हिसने शक्य तितक्या लवकर त्यांचे संरक्षण केले. यानंतर एक व्यक्ती पळून जात असताना लष्करी गणवेशातील अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी , सुरक्षा रक्षकांनी ट्रम्प यांना घेरून घेतले. त्यावेळी ट्रम्प यांचा कान आणि चेहरा रक्ताने माखलेला होता.
यावेळी झालेल्या गोळीबारात रॅलीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले. पेनसिल्व्हेनिया पोलिसांनी, ट्रम्प यांच्यावर सुमारे 400 फूट अंतरावरील इमारतीच्या छतावरून गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले.
या घटनेत संशयित हल्लेखोर मारला गेला आहे. त्याचे वय 20 वर्षे होते. हल्ल्याचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही अशी माहिती दिली आहे.