>> कोरोना महामारीच्या नायनाटाच्या दिशेने मोठे पाऊल
कोरोनावरील आपण निर्माण करीत असलेली लस चाचणीच्या तिसर्या टप्प्यामध्ये नव्वद टक्के यशस्वी ठरली असून कोरोना महामारीच्या नायनाटाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याची माहिती अमेरिकी औषध उत्पादक कंपनी ‘फायझर’ (झषळूशी) ने दिली. फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांकडून संयुक्तरीत्या या लशीचे उत्पादन सध्या सुरू आहे.
लशीचा दुसरा डोस दिल्यानंतर सात दिवसांच्या आत व पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी कोरोनाचे रुग्ण त्यापासून सुरक्षित बनल्याचा दावा सदर कंपनीचे अध्यक्ष व सीईओ अल्बर्ट बोर्ला यांनी काल केला.
जगभरातील जनतेला दिलासा देण्याच्या दिशेने आणि सध्याची जागतिक आरोग्य समस्या संपुष्टात आणण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल ठरणार असल्याचे ते म्हणाले. जगाला जेव्हा सर्वाधिक गरज आहे तेव्हा आम्ही या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत असे ते उद्गारले.
जगभरातील कोरोना रुग्णांसाठी आपण या लशीचे पाच कोटी डोस या वर्षअखेरपर्यंत आणि १.३ अब्ज डोस पुढील वर्षी पुरवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी आजचा दिवस महान आहे’ असे भावोद्गार त्यांनी काढले.
फायझर इन्कॉर्पोरेटेड ही अमेरिकी कंपनी असून तिची जर्मन भागीदार कंपनी बायोएनटेक यांनी संयुक्तरीत्या या लशीची निर्मिती सुरू केली आहे. आपण निर्मित असलेल्या लशीची तिसरी मानवी चाचणी नव्वद टक्के यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. या लशीच्या व्यापक चाचण्यांचा तपशील जाहीर करणारी ही पहिली औषध कंपनी ठरली आहे.
जगभरामध्ये सध्या किमान दहा औषध निर्मिती कंपन्या कोरोनावरील लशीच्या संशोधनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या आहेत. त्यापैकी चार कंपन्यांचे संशोधन अमेरिकेत सुरू आहे.
कोरोनावरील या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगीचे पत्र अमेरिका सरकारकडे पुढील महिन्यात सादर केले जाईल अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. या लशीच्या अतिरिक्त चाचण्या सुरू असतानाच तिच्या आपत्कालीन वापरासाठी जगभरातील देशांकडून परवानगी मिळेल असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे. अमेरिकी कायद्यानुसार तेथील अन्न व औषध प्रशासनाला कोणत्याही औषधास परवानगी देताना किमान तीस हजार लोकांमध्ये त्याची चाचणी यशस्वी झाली असणे बंधनकारक आहे. त्यामध्येही विविध वयोगट, आजाराच्या विविध टप्प्यांतील रुग्ण, जटील आरोग्य समस्या असलेले रुग्ण अशा विविध गटांतील रुग्णांमध्ये ही चाचणी यशस्वी झालेली असावी लागते. नव्या औषधाच्या वापरानंतर किमान दोन महिने त्याचे काही दुष्परिणाम दिसून येतात का याचा अभ्यासही केला जातो.
मात्र, सदर कंपनीने या सार्या प्रदीर्घ प्रक्रियेतून सूट मिळावी व १६ ते ८५ या वयोगटात या औषधाच्या वापरास आपत्कालीन परवानगी मिळावी असा प्रयत्न सुरू केला आहे. अमेरिका व पाच इतर देशांत मिळून सुमारे ४४ हजार जणांवर या लशीच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्याचा अहवाल या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्णतः उपलब्ध होताच वैज्ञानिक नियतकालिकांतून प्रकाशित केला जाईल असेही सांगण्यात आले.