>> साखळदंडाने ठेवले होते बांधून; गुराख्याच्या जागरूकतेमुळे घटना उघडकीस; सध्या बांबोळीतील गोमेकॉमध्ये उपचार सुरू
कागदावर लिहून दिली माहिती; पतीवर आरोप
अशक्तपणामुळे सदर महिलेला बोलताही येत नसून, तिने एका कागदावर इंग्रजीमध्ये आपणे म्हणणे लिहून दिले. त्यानुसार पतीने आपणास अनेक दिवस उपाशी ठेवले. तसेच तो आपणास मारहाण करत होता. त्यानंतर त्याने आपणास या जंगलात साखळदंडाने बांधून ठेवले, असे या महिलेने पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबात म्हटले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली-रोणापाल हद्दीवरील जंगल परिसरात एक अमेरिकन महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी एका गुराख्याच्या दृष्टीस ही महिला पडली. त्यानंतर याबाबत सावंतवाडी पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला पहिल्यांदा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सदर महिलेला लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवले होते. जवळपास 40 दिवस अन्नपाण्याशिवाय सदर महिला भरपावसात या जंगलात होती. आपल्या पतीनेच या जंगलात बांधून ठेवले होते, असे तिने पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबात म्हटले आहे. या महिलेवर सध्या बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.
सविस्तर माहितीनुसार, सदर महिलेचे नाव ललिता कायी कुमार एस. (49) असे असून, ती तामिळनाडूमध्ये स्थायिक झाली होती. तिच्याकडे सापडलेल्या आधार कार्डवरून ती तामिळनाडूची नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रोणापाल सोनुर्ली गावाच्या मध्यभागी असलेल्या कराडीचे डोंगर या घनदाट जंगलात ही महिला आढळून आली. तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून एका झाडाच्या बुंध्याला कुलुपबंद करण्यात आले होते. सोनुर्लीतील काहीजण गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांना या महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. सलग 40 दिवस ती याच अवस्थेत तेथे होती. अनेक दिवस उपाशी राहिल्याने तिला अशक्तपणा आला होता आणि ती महिला बोलण्याच्या स्थितीतही नव्हती.
ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात कटावणीच्या साहाय्याने तिच्या पायाची साखळी तोडली. अनेक दिवस उपाशी राहिल्याने ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तसेच पावसात भिजल्याने तिच्या पायांना सूजही आली होती.
या महिलेवर सुरुवातीला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नंतर तिला सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर तिला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असून, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले.