‘अमृत’ अक्षय तृतीया

0
159
  • प्रा. रमेश सप्रे

 

अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सर्वांनी संकल्प केला पाहिजे की क्षात्रतेज नि ब्राह्मतेज यांचा विकास आम्ही आमच्या जीवनकार्यात करु. ब्राह्मतेज म्हणजे अभ्यास, प्रयोग, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांचा विकास तर  क्षात्रतेज म्हणजे तपश्चर्या, प्रयत्न, आक्रमकता, ज्ञानाचं उपयोजन. विशेषतः आजच्या कोरोना आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर तर असा संकल्प आवश्यकच आहे.

 

अक्षय तृतीया. आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त. तसं या दिवसाचं पौराणिक नि सांस्कृतिक महत्त्व खूपच. काही झलकी पाहू या.

* सत्ययुग नि त्रेतायुग या युगांचा आरंभ या दिवशी झाला. म्हणून काही भागात अक्षय तृतीयेला ‘युगादी’ असंही म्हणतात. म्हणजे काळाशी या दिवसाचा संबंध आहे.

* या दिवशी हिमालयातील बदरीनाथ मंदिराची दारं उघडली जातात. ती दिवाळीतील भाऊबीजेपर्यंत खुली राहतात. ‘जय बदरी विशाल’ हा विष्णुनामाचा घोष दुमदुमू लागतो. असा या दिवसाचा स्थळाशी संबंध आहे.

* वृंदावनातील बांके बिहारी या कृष्णाच्या मूर्तीचं दर्शन फक्त अक्षय तृतीयेला होतं. एरवी ती मूर्ती वस्त्रांनी झाकलेली असते. अक्षय तृतीया अशी स्थल नि मंदिर यांच्याशी निगडीत आहे.

* जैन धर्मात ऋषभदेवांना महत्त्वाचं स्थान आहे. ‘नारळाचं खोबरं तर करवंटी (कट्टी)पासून वेगळं करायचं असेल तर आतलं पाणी पूर्ण आटलं पाहिजे.’ हा सिद्धांत जीवनात सत्यात उतरवण्यासाठी ते स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत. करवंटी म्हणजे देह, बाह्य आवरण आणि खोबरं म्हणजे अंतरंगीचा गाभा (सत्त्व). पाणी म्हणजे असा प्रपंचातला रस की जो आसक्ती निर्माण करून मानव म्हणून जन्माला येऊनही पशूसारखं जीवन जगवून घेतो. तो आटवण्यासाठी ऋषभ देवांनी संपूर्ण वर्षभर प्रायोपवेशन- म्हणजे अन्न-पाण्याचा त्याग केलं. व्रतसमाप्तीनंतर जेव्हा ऋषभदेव हस्तिनापूर येथे पोचले तेव्हा श्रेयांश राजानं समर्पणपूर्वक त्यांना उसाचा रस प्यायला दिला. यामुळे फळांचा रस किंवा शुद्ध, स्वच्छ पाणी शिवाय पाण्यानं भरलेला घडा (उदक कुंभ) दान दिलं तर पुण्यप्राप्ती होते अशी श्रद्धा उत्पन्न झाली. आजही ती काही भागात निष्ठेनं पाळली जाते. वैशाखाचा उन्हाळा सगळीकडे धगधगत असताना जलदान हे अमृतदानाइतकं मोलाचं आहे.

* असाच दान महिमा गतवैभव प्राप्त करण्यासाठी युधिष्ठिराला स्वतः भगवान कृष्णानं सांगितला अन् त्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ असल्याचं प्रतिपादन केलं. तेव्हापासून आज जे दान कराल ते अक्षय तुम्हाला अनंत पटीनं मिळत राहील ही परंपरा दृढ झाली.

* अक्षय तृतीयेचं आणखी महत्त्व म्हणजे कृषिसंस्कृतीचा प्रणेता समजला जाणार्‍या नांगरधारी (हलधर) बलरामाचं पूजन करून पावसापूर्वीच्या शेतीच्या कामांना आरंभ करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशात या दृष्टीनं अक्षय तृतीयेचं माहात्म्य खूप आहे. काही दिवसांनी येणार्‍या पावसाळ्यात शेतं पिकण्यासाठी नि शेतकरी हसण्यासाठी ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे.

* लिंगायत या शैव पंथाचे संस्थापक पू. बसवेश्‍वर यांचा जन्मदिवस अक्षय तृतीया हाच आहे. या पंथाचे अनुयायी शरीरावर शिवलिंग धारण करतात. स्नान, भोजन, निद्रा इ. करताना शिवलिंगाचं पूजन- ध्यान करण्याचा त्यांचा प्रघात आहे. कडक शाकाहार हे या पंथाचं महत्त्वाचं लक्षण आहे. या संदर्भात एक कथा अक्षय लक्षात ठेवण्यासारखी आहे.

पू. बसवेश्‍वरांच्या एका निकटच्या शिष्याला मांसाहाराची चटक लागली. इतर शिष्यांनी तक्रारी करूनही पू. बसवेश्‍वरांनी तिकडे लक्ष दिलं नाही. जेव्हा तक्रारी खूपच वाढल्या तेव्हा सर्वांना जमवून त्यांनी एकच प्रश्‍न विचारला, ‘बाहेरून आत जाणारं महत्त्वाचं आहे की आतून बाहेर येणारं अधिक महत्त्वाचं आहे?’ शिष्यांच्या काहीच लक्षात येईना तेव्हा पू. बसवेश्‍वर स्वतःच म्हणाले, ‘बाहेरून आत अन्न जातं नि आतून बाहेर वाणी येते. एकच जीभ दोन्ही कामं करते. तुम्ही सर्व कडक शाकाहार करता, चांगली गोष्ट आहे पण तुमची वाणी, भाषा किती कठोर, असत्य, दुसर्‍याचं मन दुखावणारी असते. याउलट तो शिष्य मांसाहार करतो पण त्याची वाणी, भाषा, बोलणं किती मधुर आणि लोकांचं सांत्वन करणारं आहे, मी सांगितल्यावर तो मांसाहार निश्चित सोडेल. पण तुम्ही आपली वाणी सुधारणार आहात का?’ सारे अर्थातच निरुत्तर झाले. पण त्यांना जीवनाचं मर्म कळलं – जेवण महत्त्वाचं आहेच, पण सुसंस्कृत जीवन अधिक मौल्यवान आहे.

* अक्षय तृतीयेचं आणखी एक माहात्म्य म्हणजे भगवान परशुरामांचा जन्म. यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून न पाहता एक वृत्ती किंवा शक्ती म्हणून पाहिलं तर आजच्या परिस्थितीत जगाचं कल्याण होईल. एक तर परशुराम चिरंजीव आहेत याचाच अर्थ त्यांचं कार्य नि संदेश चिरंजीव आहे.

त्यांच्या व्यक्तिगत जीवनातही महत्त्वाच्या घटना घडल्याहेत. पण त्यापेक्षा त्यांचं- सामाजिक कार्य महत्त्वाचं आहे. त्यांचं वर्णन करणारा जो प्रसिद्ध श्‍लोक सांगितला जातो त्यात मानवी जीवनाच्या चिरकालीन हिताचा संदेश आहे.

 

अग्रतो चतुरो वेदान् पृष्ठतो सशरं धनुः |

इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥

 

म्हणजे – पुढे चार वेदांची पालखी किंवा मिरवणूक निघालीय. आणि वेदांचं म्हणजे शुद्ध ज्ञानाचं रक्षण करण्यासाठी मागे धनुष्यबाण घेतलेला धनुर्धारी वीर निघालाय. मग वाटेत कोणतंही संकट आलं तरी क्षात्रतेजाचा पराक्रम किंवा ब्राह्मतेजाचा शाप ते संकट दूर केल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवानं ब्राह्म- क्षात्र या शब्दांना वर्णांचे किंवा जातींचे संदर्भ प्राप्त झाले. परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. यातला भावार्थ तर समजून घेतला जात नाही. एकदाच निःक्षत्रिय केल्यावर पुन्हा क्षत्रिय आलेच कुठून असे प्रश्‍न विचारले जातात. हे अज्ञान आहे. यात दोन गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहेत. एक म्हणजे परशुरामांनी क्षत्रिय स्त्रिया, मुलं, वृद्ध यांना मारलं नाही. म्हणजे क्षत्रिय उरलेच. त्यातून मग सूडानं पेटलेले, प्रजेचं रक्षण ऐवजी भक्षण करणारे उन्मत्त क्षत्रिय राजे निर्माण झाले नि होत राहिले. अशा एकवीस पिढ्यातील उद्धट, उन्मत्त क्षत्रियांचं निर्दालन परशुरामानं केलं. मग एकवीस वेळाच का? या प्रश्‍नाचं स्पष्ट उत्तर हे की ज्यावेळी श्रीराम या आदर्श क्षत्रिय राजाचं अवतारकार्य सुरू झालं होतं त्यावेळी आता परशुरामाचं कार्य रामच करणार होता. शेवटचा प्रसंग हा राम- परशुराम भेटीचाच मानला जातो. दोघंही परंपरेनं भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. श्रीरामाला आलिंगन देऊन, परस्परांनी एकमेकाला प्रदक्षिणा घालून परशुराम रामकार्याला आशीर्वाद देऊन महेंद्र पर्वतावर तपश्चर्येसाठी गेले ते कायमचेच.

अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सर्वांनी संकल्प केला पाहिजे की क्षात्रतेज नि ब्राह्मतेज यांचा विकास आम्ही आमच्या जीवनकार्यात करु. विशेषतः आजच्या कोरोना आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर तर असा संकल्प आवश्यकच आहे.

ब्राह्मतेज म्हणजे अभ्यास, प्रयोग, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांचा विकास तर  क्षात्रतेज म्हणजे तपश्चर्या, प्रयत्न, आक्रमकता, ज्ञानाचं उपयोजन इ.

* कशी आहे यावेळची अक्षय तृतीया?…

यावर्षीचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे. सुवर्णसंधीचा काळ आहे. हे वाचून विचित्र वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. कशी ते पाहू या.

संक्रमण म्हणजे कोरोना विषाणूंचं संक्रमण नाही किंवा कोविद-१९ या रोगाचं संक्रमण नाही. त्याला संसर्ग म्हणतात.

संक्रमण म्हणजे क्रांती. आणि सुवर्णसंधी म्हणजे परिवर्तनासाठी संधी. हा एक प्रकारचा संधिकाल आहे. दोन्ही शक्यता आहेत. सायंसंधीकालाचा विचार केला तर यापुढे अंधार- अधिक अंधारच असणार आहे. मानवतेचा प्रवास उलटा चालू होण्याची शक्यताही आहे म्हणजे ‘ज्योतिर्मा तमसो गमय!’

पण प्रातःसंधिकालाचीही शक्यता आहे म्हणजे अंधाराकडून उगवतीकडे, अंधारातून प्रकाशाकडे असा मानवजातीचा शुभ प्रवास सुरु होऊ शकतो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्राचीन ऋषींची प्रार्थना सत्यात उतरु शकते. थोडक्यात आत्ताच्या परिस्थितीच्या पोटात ही शक्यताही निश्चित दडलीय….

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश…

चहू दिशांनी वाहे प्रकाश प्रकाश!…

 

असं काय घडलंय किंवा घडतंय किंवा घडू शकेल?

ही वस्तुस्थितीच पहा ना –

* ‘बाळांनो, पुन्हा माझ्या कुशीत या रे’ ही वसुंधरेची म्हणजे पृथ्विमातेची वत्सल हाक ऐकू येऊ लागलीय. नैसर्गिक म्हणजे निसर्गस्नेही जीवनशैली आपोआप प्रत्यक्षात येऊ लागलीय. पृथ्वीच्या सर्वंकष प्रदूषणाचं प्रमाण खूप कमी झालंय. याचा परिणाम हवा, जमीन, पाणी यातील प्रदूषण निश्चित कमी झालंय. शहरात धुरक्या (स्मॉग्)ऐवजी स्वच्छ आकाश दिसू लागलंय. हवा खूप शुद्ध झाल्यानं नाकालाच नव्हे तर फुप्फुसांनाही जाणवू लागलंय.

रस्त्यावर धावणार्‍या गाड्या नव्वद टक्के कमी झाल्यानं धूर नि त्यातील विषारी द्रव्य हवेत सोडली जात नाहीयेत. आणि त्यांच्या भोंग्यांचे (हॉर्न्स) आवाज थांबल्यानं मनाला दुभंग करणारं ध्वनिप्रदूषणही कमीत कमी झालंय.

यावर्षीचा वसुंधरा दिवस (मदर अर्थ डे, २२ एप्रिल) हा गाजावाजा न होता, कंठाळी घोषणा, कंटाळी (कंटाळवाणी) भाषणं, त्याच त्या पोस्टर, नि संदेश तयार करायच्या यांत्रिक स्पर्धा हे सारं घडलंच नाही. भूमातेनंसुद्धा याबद्दल सुटकेचा निःश्‍वास टाकला असेल.

* घरातली आई, जी नोकरीमुळे बाई किंवा आया झाली होती ती पुन्हा ‘आई’ बनलीय. मम्मी किंवा मॉम् असली तरी मायेची ऊब नि ममतेचा स्पर्श तोच जो आजच्या आईनं मूल म्हणून तिच्या आईचा अनुभवला होता.

* एकूणच घराचं घरकुल झालंय (हाऊस हॅज बिकम् होम) आणि काही ठिकाणी तर घरकुलाचं घरटं (उबदार – वॉर्म नेस्ट) बनलंय. काही ठिकाणी तीन पिढ्या एकत्र नांदताहेत तेही मधली अंतराची फट (जनरेशन गॅप) विसरून. दूरचित्रवाणीवर ‘रामायण’- ‘महाभारत’ या मालिका पुन्हा प्रक्षेपित करताहेत ते केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर उद्बोधनासाठीसुद्धा. ‘हम आपके है कौन’ याची भावपूर्ण जाणीव होऊ लागलीय. तर ‘हम साथ साथ हैं’चा संकल्प उदयाला येऊ लागलाय. याला केवळ ‘लॉक् डाउन’ (कुलूपबंद अवस्था) जबाबदार नाहीये तर अंतरीची ओढ, भावनांची तहानही जबाबदार आहे.

* पृथ्वीच्या (‘ग्लोबल वॉर्मिंग) गरम होण्याबद्दलची चिंता तात्कालिक का होईना पण तात्पुरती कमी निश्‍चित झालीय. ओझोन वायूचं उत्तर ध्रुवाकडचं छिद्र बुजायला सुरुवात झालीय पण त्याचे सुपरिणाम तेव्हाच दिसतील जेव्हा सध्याचं लॉक डाउन संपल्यावरसुद्धा आपण अधिकाधिक जबाबदारीनं नि शिस्तीनं वागू. थोडक्यात आपलं सध्याचं वर्तन हे अक्षय बनलं पाहिजे.

* सामाजिक- आर्थिक पातळीवर तर याचे परिणाम नजीकच्या भविष्यकाळात भीषण स्वरूपात अनुभवाला येतील. कारखानदारी, उद्योगव्यवस्था तीव्र संकटात येऊन पहिली कुर्‍हाड नोकर्‍यांवर पडणार आहे. लोक लाखांच्या संख्येत बेकार होणार आहेत. ही कोणत्याही समाजासाठी धोक्याची घंटाच आहे.

* सध्या ‘खाऊ संस्कृती’, ‘चंगळवाद’ यांना भरती आली होती. मॉल्स, सुपरमार्केट्‌स तेजीत चालत होती. आता याला ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे. धाबे नि टपर्‍या या कोटीकोटींचा व्यवसाय करत होत्या. रस्त्यावरच्या फास्ट फूड, जंक फूडच्या दुकानांची अक्षरशः कोटिच्या कोटी उड्डाणे सुरू होती. याच्यावर मोठा आघात होणार आहे. बाहेरचं, उघड्यावरचं खायला लोक एकदम तयार होणार नाहीत.

पिझ्झा- पास्तापेक्षा पराठा- थालिपीठ यांना बरे दिवस येणार आहेत. मुख्य म्हणजे घरच्या खाण्याचं, शाकाहारी जेवणाचं महत्त्व पटल्यानं घरची अन्नपूर्णा प्रसन्न होणार आहे.

* प्रश्‍न आहे तो युवापिढीचा. आजही घरातल्या घरात त्यांनी मोबाइल, लॅपटॉप यामुळे स्वतःचं विलगीकरण केल्यासारखी परिस्थिती आहे. रोज काही वेळ ‘मोबाइल मौन’ पाळून घरातील सर्वांनी सुखसंवाद करणं आवश्यक आहे. निरोगी कुटुंब, शांत वास्तू बनण्यासाठी लॉकडाउन संपल्यावर ही स्वतःमधली माणुसकी अन्लॉक करण्याची गरज आहे.

पेट्रोलच्या किंमती उतरल्यामुळे अधिक बेदरकारपणे, बेछूट वाहनं चालवणं; घरबसल्या मिळालेल्या पगारामुळे अधिक चैन चंगळ करणं; दबले गेलेले वीकएंड्‌स अधिक उफाळून आलेल्या उत्साहानं साजरे करणं, सध्याचं दोन काठातून वाहणारं जीवन एकदम स्वैर बनवणं या गोष्टी आत्मसंयमानं टाळल्याच पाहिजेत. सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग), चेहर्‍यावरचे मास्क, गर्दी करणं टाळणं या गोष्टी बाहेरून नियंत्रण केल्यामुळे आपण करुही. पण आत्मशिस्त, स्वयंअनुशासन विकसित करायला काय हरकत आहे.

* सामाजिक माध्यमांचा (सोशल मिडिया) अतिरेक टाळणं अत्यावश्यक आहे. सेल्फी, पोस्टिंग- पेस्टिंग- फॉरवर्डिंग खूप कमी करण्यात आपली आत्मप्रतिमा (सेल्फ इमेज) आणि स्वतंत्र प्रतिभा (ओरिजिनल् क्रिएटिव्हिटी) अधिक उजळून निघतील.

* एक महत्त्वाची सवय सध्याच्या वातावरणात आपण लावून घेतलीय. मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वार बंद असल्याने घरीच प्रार्थना, व्रतसंकल्प, उत्सव साजरे करणं सुरु केलंय. हे प्रार्थनास्थळं उघडली म्हणून तिथं गेलो तरी वैयक्तिक पातळीवर सुरू ठेवलं पाहिजे.

* आज केवळ शारीरिक व्यायाम, योगासनं यापेक्षा योगसाधना, ध्यानधारणा या आतील उपासनांचं महत्त्व सार्‍या मानवजातीला कळलंय. सकारात्मक विचारसरणी आणि होकारात्मक किंवा ॐकारात्मक जीवनशैली हा सर्व काळात कल्याणाचा मार्ग आहे ही खूणगाठ मनात बांधली पाहिजे.

* जगातले आर्थिक, औद्योगिक, सामरिक (मिलिटरी)दृष्ट्या असलेले सारे युरोपातले देश नि मुख्य म्हणजे अमेरिका एकाच पातळीवर म्हणजे गुडघे टेकल्याच्या अवस्थेत आलेयत. त्यांना आपल्या मर्यादांची जशी जाणीव झालीय तशीच भारताच्या आंतरिक सामर्थ्याची कल्पनाही आलेली आहे. केवळ हात जोडून नमस्कार करणं, चपलाबूट बाहेर ठेवून घरात येणं, वारंवार विशेषतः जेवणापूर्वी हात धुणं या वरवरच्या गोष्टीतच नव्हे तर आहार, विहार, विचार, उच्चार (काही संस्कृत मंत्र, स्तोत्रं इ.) नि आचार या महत्त्वाच्या पाच गोष्टींची भारतीय जीवनशैली जगाला पटलीय.

* सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रदूषित नद्या माणसं दूर राहिल्यामुळे स्वच्छ पाण्यानं वाहताहेत. वैज्ञानिक कसोट्या घेऊन आज ऋषिकेश, हरिद्वार येथील गंगेचं पाणी पिण्याच्या योग्यतेचं झालंय. तर यमुनेचं पाणी वापरायला नि उकळून प्यायला योग्य झालंय.

आज गंगा पुन्हा अमृतगंगा झालीय. जीवनसरिता बनलीय. असं म्हटलं जातं की ‘द स्टोरी ऑफ् गंगा इज द हिस्टरी ऑफ् इंडिया’. आज पुन्हा गंगेसारखं सार्‍या मानवतेचं, मानवजातीचं जीवन अमृतमय बनो!

सारी राष्ट्र कुटुंबासारखी एकत्र नांदोत. ‘वसुधैव कुटुंबकम्’, ‘भूता परस्परें पडो मैत्र जीवांचे’ अशी वाक्य केवळ सुभाषितं न राहता जीवनात उतरोत अशी अक्षय प्रार्थना करु या.

आजची रोज जगभर वाढणारी मृत्यूंची संख्या, महामारीचा अंधार पाहिला की खरंच ऋषींच्या शब्दात म्हणावंसं वाटतं…

असतो मा सद्गमय | तमसो मा ज्योतिर्गमय |

मृत्योर्मा अमृतं गमय.. अमृतं गमय.. अमृतं गमय ॥