- गिरिजा मुरगोडी
बाकीबाबांनी ललित, कथा, कादंबरी, अनुवाद, चरित्रलेखन असे विविध वाङ्मयप्रकार हाताळले. पण प्रामुख्याने कविता हीच त्यांना सतत साद घालत राहिली आणि कविता हीच त्यांची आत्मसाधना झाली. बाकीबाबांचे साहित्यचिंतन, निर्मितीविषयक आणि इतरही जे विचारधन आहे तेही अनमोल अशी मौक्तिकंच आहेत. असा एक प्रतिभावंत आपल्या गोमंतभूमीत जन्माला. त्यानं आपलं जगणं समृद्ध केलं. त्यांचा हा वारसा जतन केला जावो, त्यांच्या प्रेरणेने या भूमीत सार्थ सृजनसोहळे घडत राहोत ही आस बाकीबाबांचे स्मरण करत असताना, त्यांना वंदन करत असताना व्यक्त करते.
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे…
निर्मितीचे निरंतर डोहळे आणि मंगलाने गंधलेले सुंदराचे सृजनसोहळे जीवनभर ज्यांनी साजरे केले, ज्या सोहळ्यांच्या चैतन्यस्पर्शाने आपलेही जगणे उजळून टाकले, त्या बाकीबाबांचा स्मृतिदिन ‘गडद निळे जलद’ आपल्यासोबत घेऊन येतात. 8 जुलै… मनामनांत अढळ स्थान मिळवलेल्या या कविश्रेष्ठाचा स्मृतिदिन, म्हणजे त्यांच्या अक्षरकाव्यातून, त्यांच्या जीवनदृष्टीमधून, त्यांच्या सखोल चिंतनामधून पुन्हा पुन्हा प्रेरणा घेत राहण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस!
बाकीबाब- बा. भ. बोरकर… नाव उच्चारताच स्मरतात अनेकानेक अजरामर काव्यशिल्पे, अनेक बहारदार आणि हृद्य मैफिली… जीवन ज्यांना अंतरोर्मीतून कळले, आकळले आणि त्याची आनंदयात्रा झाली, कवितेच्या नशेत जे जगले, ‘पोएट बोरकर स्पीकिंग’ असे सांगत आपले कवी असणे ज्यांनी सार्थ अभिमानाने मनःपूर्वक साजरे केले असे एक अपूर्व व्यक्तिमत्त्व. त्यांचे असामान्य व्यक्तिमत्त्व आणि त्यांची नितांत रमणीय, तितकीच आशयसंपन्न कविता यांचे जनमानसांवर असलेले गारुड अजून कायम आहे. कारण या प्रतिभावंताने अपरंपार अशा समृद्ध संचितांचे आणि निखळ आनंदाच्या कितीतरी चिरंतन क्षणांचे अपूर्व देणे तमाम रसिकांना भरभरून दिलेले आहे. हे गारुड आजवर कायम आहे.
बाकीबाबांचे कवी म्हणून, माणूस म्हणून असणारे श्रेष्ठत्व, त्यांची जीवनदृष्टी, खरे तर त्यांचे अवघे जीवनच प्रेरणा देणारे आहे!
जेथे हिरवळ आणि पाणी
तेथे स्फुरती मजला गाणी
असे सहजस्फूर्त उद्गार निघावेत अशा निसर्गसंपन्न बोरी गावात बाकीबाबांचे बालपण गेले. पिढ्यान् पिढ्या चालत आलेली भजनी परंपरा, संत परंपरा; हरिविजय, भक्तिविजय, पांडवप्रताप, आर्याभारत या आणि अशा ग्रंथांचे नित्यनियमाने होणारे वाचन, आजूबाजूच्या देवळांमधून होणारी कीर्तने-प्रवचने या सर्वांचे संस्कार त्यांच्या मनावर होत गेले. संतसाहित्य त्यांचे प्रेरणास्थान होते. ज्ञानेश्वरीची तर कितीतरी पारायणे त्यांनी केली होती. संगीत, साहित्य, चित्र अशा सर्व कलांचा जवळून परिचयही या संस्कारक्षम वयात झाला. याचबरोबर भोवतालची सामाजिक, राजकीय परिस्थिती, घडणारे वेगवेगळे बदल या सर्वांचे ते साक्षीदार होते. अशा पार्श्वभूमीवर समृद्ध संचितासह त्यांचे आयुष्य वेगवेगळी वळणे घेत पुढे सरकत होते. त्यांचे सजग, संवेदनशील मन वेगवेगळ्या अनुभूतींना सामावून घेत, त्यांचे अन्वयार्थ लावत वेगवेगळ्या प्रकारे अभिव्यक्त होत होते. त्यांची मनस्वी वृत्ती आणि चिंतनशीलता या अभिव्यक्तीला वेगळे आयाम देत होती. त्यांची रसिकता, प्रसन्न जीवनदृष्टी, निसर्गप्रेम, गोमंतभूमीविषयी ओढ आणि आत्मीयता या सर्वाची प्रचिती त्यांच्या काव्यामधून येत राहते.
बाकीबाबांच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. संघर्षाचे प्रसंग आले. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातही ते सहभागी झाले. जिवापाड तळमळीने त्यासाठी काम केले. दैनंदिन जीवनात, संसारात अनेक तापत्रये सोसली. पण त्यांच्या काव्यात, वृत्तीत कटुता, वैषम्य यांचा लवलेश नव्हता. ते स्वतः म्हणत असत, ‘कवीचा मनोधर्म चंद्रासारखा असतो. सगळा ताप सहन करून त्याचं चांदणं करणं हे कवीचं काम असतं.’ त्यामुळे त्यांच्या लेखणीतून नित्य रसप्रसन्न काव्यच आविष्कृत होत राहिले.
बाकीबाबांनी एका मुलाखतीत म्हटले होते, ‘वयाच्या तेराव्या वर्षापासून कुटुंबकारण, समाजकारण आणि ‘पोट’कारण यांच्या वेगवेगळ्या आघाड्यांवर खर्ची पडत असताना मला सवड आणि स्वास्थ्य जवळजवळ नव्हतेच. जे थोडे पदरात पडले आहे ते माझा ध्यास जबरदस्त आणि ईश्वराची कृपा थोर म्हणूनच!’
ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर बोरकरांचे अद्वितीयत्व अधिकच अधोरेखित होते.
या सर्व प्रवासामध्ये त्यांना सहधर्मचारिणीची जी साथ लाभली तीही फार मोलाची. ओढगस्तीच्या परिस्थितीत मोठ्या एकत्र कुटुंबामधील सर्व जबाबदाऱ्या, कुळधर्म, रीतीभाती, नातीगोती, मुलं-माणसं, पाहुणे-रावळे असे सर्व व्याप त्यांच्या पत्नीने सक्षमतेने आणि हसतमुखाने सांभाळले, निभावले. संसारातील अनेक कसोटीच्या प्रसंगांना, संकटांना धैर्याने तोंड दिले. याशिवाय बोरकरांच्या सार्वजनिक जीवनाशी निगडित कार्यकर्ते, पुढारी मंडळी यांची व्यवस्थाही वेळोवेळी पाहिली. या सर्व व्यापांत सतत व्यग्र असताना बोरकरांसारख्या मनस्वी माणसाला समजून घेऊन त्यांची तंत्रे, त्यांचे मन सांभाळले. हे सर्व प्रसन्नपणे, मनःपूर्वक करत राहाणे हे एक कठीण व्रत होते, आणि ते ज्या सोशिकतेने त्या निभावत असत ते पाहून बोरकरांना कौतुक आणि आश्चर्यही वाटे. प्रतिकूल परिस्थितीत आपल्यासारख्या माणसाला त्याच्या कविवृत्तीसह, आकांक्षा, अस्वस्थता, भडक स्वभावासह समजून घेत सांभाळणे म्हणजे ‘जळता निखारा हातावर खेळवीत नेण्यासारखे’, ‘वस्तऱ्याच्या पात्यावरून चालण्यासारखे होते’ असे स्वतः बोरकरांनीच म्हटलेय. या साहचर्यामुळेच त्यांना त्यांची काव्यसाधना, शिक्षण, सार्वजनिक कार्ये आणि ध्येयापायी पत्करलेली साहसे निर्वेधपणे तडीला नेता आली, हेही ते आवर्जून नमूद करतात. जेव्हा बोरकर नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यलढ्यात उघडपणे सामील झाले तो तर फार मोठा कसोटीचा प्रसंग होता. घरची परिस्थिती आणि वाढत्या संसाराचा व्याप या कशाचा विचार न करता घेतलेल्या त्यांच्या निर्णयाला पूर्ण समर्थन, कणखर आणि समंजस साथ या माऊलीने दिली. आज या कविश्रेष्ठाचे स्मरण करत असताना त्या माऊलीसमोरही नतमस्तक व्हावेसे वाटते!
सततच्या अस्थिर आणि संघर्षमय आयुष्यात तावून-सुलाखून निघत असताना बोरकर आपल्या चंद्रासारख्या मनोधर्मामुळे आणि चिंतनशील वृत्तीमुळेच रसमधुर आणि आशयसंपन्न काव्यनिर्मिती करू शकले.
डॉ. घनश्याम बोरकर यांनी या कविवर्याच्या कवितेचं अतिशय सार्थ वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, ‘बोरकरांची कविता म्हणजे एकीकडे निसर्गाच्या ऋतुनाट्याच्या, भावभावनांच्या, ऐंद्रिय संवेदनांच्या विविध रूपांनी फुललेली लावण्यजत्रा आहे, तर दुसरीकडे निराकाराकडे, मूर्तातून अमूर्ताकडे, व्यक्तातून अव्यक्ताकडे निघालेली एक आनंदयात्रा आहे.’
या सर्वाचा प्रत्यय बाकीबाबांच्या काव्यामधून येत असतो. कारण बोरकरांसाठी कवितालेखन हे फार मोठे आत्मसाधन आहे. साक्षात्काराची ती आत्मसाधना आहे! आणि ही आत्मसाधना ते फार तन्मयतेने करत असत.
ते म्हणत, ‘आपली सतार सुरात ठेवणे एवढेच कवीचे काम. मग अज्ञाताच्या करांगुल्या तिच्यावर आपसुक आपली करामत करू लागतात आणि त्यातून निघणाऱ्या निरनिराळ्या स्वरशब्दांच्या आणि रसभावांच्या चित्राकृती पाहून स्वतः कवी चकित होतो आणि क्षणाक्षणाच्या अनपेक्षित आत्मसाक्षात्काराने रोमांचित होतो.’
लहानपणापासूनच त्यांना शब्दांचं विलक्षण आकर्षण होतं. लहान मुलं लोलक जमवतात तसे मी शब्द जमवत गेलो असे ते म्हणत. पुढे शब्दांविषयीचे चिंतन मांडताना त्यांनी म्हटलेय की, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सर्व तत्त्वांपासून त्यांच्यापेक्षाही सूक्ष्म आणि त्यांची सत्त्वे घेऊन बनलेला असा शब्द अवतीर्ण झालेला आहे.
शब्दांइतकेच त्यांना रंगांचेही वेड होते. त्यांचे वडील भिंतीवर चित्रे काढीत आणि ते चित्रकाम बाकीबाब तासन् तास टक लावून बघत असत. त्यांची पाठ फिरली की फडताळातल्या त्यांच्या रंगांच्या पुड्या उघडून ते समोर मांडत असत. तांबडा, निळा, चांदवर्खी, सोनवर्खी असे सारे रंग त्यांना भुरळ घालीत. त्यांचे हे रंगाचे वेड त्यांच्या अनेक कवितांमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. ‘हळद लावुनि आले ऊन’ ही रम्य श्रावणवेळा चितारणारी कविताच पहा ना…
हळद लावुनि आले ऊन, कुंकुमाक्षता फुलांमधून
झाडांमधुनी झडे चौघडा, घुमते पाणी लागुन धून
नाचुन मिटली श्रावणधार, शीतल पाऱ्यापरिस दुपार
निळीतुनी हिरव्यांत भुरळली पिवळी सोनपिसोळी चार…
निसर्गातला रंगोत्सव त्यांच्या शब्दांमधून, चित्रदर्शी शैलीमधून डोळ्यांसमोर किती लोभसपणे साकार होतो!
स्वर्ग नको सुरलोक नको,
मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्ति नको,
पण येथील हर्ष नि शोक हवा
असं म्हणणारे बाकीबाब या इहलोकीचा प्रत्येक अनुभव अगदी समरसून घेत असत. यामुळेच प्रसन्न निसर्गगान, उत्कट प्रणयाराधन, हळुवार प्रेमगान त्यांच्या काव्यात लोभसपणे येते. त्याचबरोबर देशभक्ती, परमात्मचिंतन, जीवनचिंतन हेही सुभगतेने येते.
नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी
हे ते निर्लेपतेने सांगून जातात. कारण-
खेळून सर्व नाती
उरलो पुन्हा निराळा
लंघून राहिलो मी
माझ्याही संचिताला…
ही अनुभूती त्यांनी घेतलेली आहे.
त्यांचे उचंबळून येणे मनस्वी आणि शांत शांत किनाऱ्याशी विसावणे शांतवणारे. कारण त्यांचा अमृताचा चंद्र त्यांना गवसलेला आहे.
या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे
अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे
त्याजला मी चुंबिल्याने आतही ते झाड आहे
अमृताचा चंद्र माझ्या पालवीच्या आड आहे…
अशी विलक्षण बाकीबाबांची कविता. तिचे माधुर्य, सौंदर्य, रसवैभव हे सर्व फक्त अनुभवायचे!
बाकीबाबांनी ललित, कथा, कादंबरी, अनुवाद, चरित्रलेखन असे विविध वाङ्मयप्रकार हाताळले. पण प्रामुख्याने कविता हीच त्यांना सतत साद घालत राहिली आणि कविता हीच त्यांची आत्मसाधना झाली. बाकीबाबांचे साहित्यचिंतन, निर्मितीविषयक आणि इतरही जे विचारधन आहे तेही अनमोल अशी मौक्तिकंच आहेत.
असा एक प्रतिभावंत आपल्या गोमंतभूमीत जन्माला. त्यानं आपलं जगणं समृद्ध केलं. हा वारसा जतन केला जावो, त्यांच्या प्रेरणेने या भूमीत सार्थ सृजनसोहळे घडत राहोत ही आस बाकीबाबांचे स्मरण करत असताना, त्यांना वंदन करत असताना व्यक्त करते.
देखणी ती जीवने जी तृप्तिची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे…
हे अक्षय चांदणे असेच बरसत राहो!
बाकीबाबांचे स्मारक व्हावे!
बाकीबाबांचे हे संचित, हा सांस्कृतिक- वैचारिक वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत संक्रमित होण्यासाठी त्यांचे आत्मीयतेने आणि अदबीने जतन होणे आवश्यक आहे. जगभरात विविध लेखक, कवी, कलाकार यांची स्मारके, स्मृतिस्थळे उभारली गेली आहेत. या प्रतिभावंतांनी जिथे वास्तव्य केले त्या वास्तूत त्यांचे समग्र साहित्य, त्यांच्या वापरातल्या वस्तू हे शासकीय व सामाजिक स्तरावर सन्मानाने जतन केले जात आहे. लंडनमधील शेक्सपियर मेमोरियल, आपल्याकडील कवी केशवसुत स्मारक, कवी कुसुमाग्रज स्मारक, रवींद्रनाथांची ठाकुरवाडी अशी अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. आपल्या बाकीबाबांचे वैशिष्ट्यपूर्ण असे सुंदर स्मारक या पाचूच्या प्रदेशात उभारले गेले तर हा अनमोल वारसा जतन केला जाईल आणि अनेक प्रकारे प्रेरणा देण्याचे कार्यही घडू शकेल. आपल्या गोमंतभूमीसाठी ते भूषण असेलच, पण ज्यांच्या मनावर बाकीबाबांच्या काव्याच्या इंद्रदिनांचा असर अजून आहे अशा महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठी रसिकजनांसाठीही ते एक हृद्य आकर्षण ठरू शकेल.
बाकीबाबांच्या कवितेविषयी…
‘सहजता आणि सुभगता, रम्य कल्पकता आणि कोमल भावगर्भता, सौंदर्याची ओढ आणि तिला मिळालेली उदात्ततेची जोड यांचा बोरकरांच्या कवितेत मधुर संगम झालेला आहे.’
- वि. स. खांडेकर
‘कवितेची नशा असते, कवितेचे गायन म्हणजे कविता चढल्यानंतरचे झिंगणे आहे याचे पहिले दर्शन बोरकरांनी घडवले.
बोरकरांची कविता अंतःकरणातल्या विविध तंतूवाद्यांतले एखादे वाद्य थरथरायला लागून त्यातून उमटत असते.’ - पु. ल. देशपांडे
‘रससिद्ध कवितेचे वरदान बोरकरांना लाभलेले आहे. रंग, गंध, रस, रूप यांचा लावण्यमहोत्सव म्हणजे बोरकरांची कविता!’ - मंगेश पाडगावकर
जिवलग जन हो
दूर जवळचे जिवलग जन हो असाल तेथे सुखी असा
कुठे पोळता, कविता माझी जरा मुखी घोळीत बसा
संत न मी कुणि मुनी तापसी केवळ तुमचा हृदय सखा
तुमच्यासम माझ्याही करवी घडल्या असतिल त्याच चुका
व्यथा कुणाला चुकल्या का कधि? संतकथा उमजून पहा
जेणे ते सुटले विळख्यातुन तो अतिरस शोधीत रहा
तो न अलिकडे, तो न पलिकडे उरीच आहे अवघडला
आसुसला जो त्याला अविरत, त्याला अवचित सापडला