अमृतसर
अमृतसर-जोदा फाटक येथील चौडा बाजार भागात रावणदहनाचा कार्यक्रम सुरू असताना झालेल्या भीषण रेल्वे अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी किमान ७२ जण जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांत रावणदहन कार्यक्रमासाठी आलेल्या अनेक लहान मुलांचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. आसमंत आक्रोश आणि किंकाळ्यानी भरला होता. दरम्यान, मृतांच्या नातेवाइकांना पंजाब सरकारने प्रत्येकी ५ लाख तर केंद्र सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले असून जखमींना तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले आहेत. अमृतसरमधील जोदा फाटक भागामध्ये रेल्वे मार्गालगत मैदानात रावणदहनाचा कार्यक्रम बघण्यासाठी शेकडो जण जमले होते. संध्याकाळी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन झाल्यानंतर फटाके फोडण्यात आले. त्याचवेळी रुळांलगत उभे असलेले शेकडो लोक मैदानाकडे वेगाने सरकू लागले. उपस्थितांपैकी अनेकजण त्या रावण दहनाचे दृश्य पाहत चित्रीकरण आपल्या मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी धडपडत होते. त्याचवेळी वेगाने आलेल्या जालंदर-अमृतसर गाडीने लोकांना चिरडले.