- डॉ. सोमनाथ कोमरपंत
२६ ऑगस्ट २०१९ रोजी डॉ. अनिल अवचट आपल्या कृतिशील जीवनाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. शुभंकर हातांची देणगी लाभलेल्या डॉ. अवचटांनी अनेक विधायक कार्ये केली… करत आहेत… लिहिणारा हात त्यांना लाभला आहे… आनंदनिर्मितीबरोबरच अंतर्मुख करणे हे त्यांच्या लेखनाचे प्रयोजन… त्यांच्या लेखनातून त्यांचे प्रगल्भ समाजभान व्यक्त झाले आहे… समाजातील निष्क्रियतेवर त्यांनी नेमकेपणाने बोट ठेवले… दुबळ्या समाजघटकांविषयी वाटणारी कणव त्यांनी परिणामकारकतेने व्यक्त केली… त्यांच्या आत्मप्रत्ययशील लेखनामुळे समाजाला नवा नेत्र लाभतो… प्रसन्न शैलीतील आत्मपर लेखनही त्यांनी केले. डॉ. अवचट समाजमनस्क कार्यकर्ते… प्रतिभासंपन्न साहित्यिक… उत्कृष्ट चित्रकार… विचारवंत… अनेकविध छंद जोपासणारे अभिरूचिसंपन्न असे हे व्यक्तिमत्त्व… आणखी बरेच काही… या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ः
अनिल अवचट या नावात जोडाक्षरे नाहीत. त्यामुळे ती उच्चारायला सोपी. ते वागायला सरळ… त्यांच्या अंतःकरणातील ऋजुता, सरलता त्यांच्या अक्षरांत उतरलेली. नावात जोडाक्षरे नसली तरी अक्षरांनी माणसांची हृदये जोडण्याची कला त्यांनी चांगलीच अवगत केलेली… त्यांनी पायांना भिंगरी लावून विधायक कार्यासाठी केलेल्या भारतभ्रमणामुळे, शुभंकर हाताने केलेल्या विचारप्रवर्तक आणि सृजनशील लेखनामुळे, त्याच हातांनी चित्रकला, काष्ठशिल्प, ओरिगामी आणि बासरीवादन इत्यादी कलाविष्कारांमुळे त्यांनी सर्वत्र मित्र जोडलेले आहेत. स्वस्थचित्त राहाणे हा डॉ. अनिल अवचटांचा मनःपिंड नव्हे. नुसत्या गप्पा-गोष्टी करण्यात त्यांना रस वाटत नाही. ते आत्मीयतेने बोलतील, पण बोलता बोलता कागदावर सौष्ठवपूर्ण चित्राकृती काढतील किंवा ‘ओरिगामी’च्या आधाराने अनेक मनोरंजक चीजवस्तू तयार करतील.
पाकक्रियेतसुद्धा रस घेतील. ते कितीही कामात व्यग्र असोत, तणावग्रस्त असोत, पण त्यांचा चेहरा कधीही आक्रसलेला आढळणार नाही. ते सदैव हसतमुख. वृत्तिगांभीर्य हा त्यांचा स्थायी भाव असला तरी त्यांची नर्मविनोदी वृत्ती त्यांना कधी सोडून गेलेली आहे असे जाणवत नाही. जीवन समरसतेने कसे जगावे आणि रसमयतेने जीवनाचा आस्वाद कसा घ्यावा हे डॉ. अनिल अवचटांकडून शिकावे. एवढेच नव्हे तर त्यांनी ‘मुक्तांगणा’च्या माध्यमातून व्यापक समाजसेवेचा मार्ग पत्करला आहे.
डॉक्टरी व्यवसाय हे खरे पाहता समाजसेवेचे व्रत. पण या व्यवसायाला आजकाल भौतिक समृद्धीचे साधन म्हणून पाहिले जाते. व्यवसायाने डॉक्टर असलेले अनिल अवचट लेखनसाधनेत का रममाण झाले या प्रश्नाचे उत्तर येथे सापडते. त्यांच्या सहजीवनात उत्तम प्रकारे साथसंगत करणार्या डॉ. सुनंदा अवचट यांनीही अवचटांची प्रतिभ शक्ती ओळखून त्यांना लेखनाकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यांनीही तो मानला. मराठी साहित्याचे आगळे-वेगळे दालन समृद्ध करण्याचे श्रेय त्यांना मिळाले. मी प्रथम कार्यकर्ता आहे आणि मागाहून लेखक आहे असे डॉ. अवचट विनयशीलतेने म्हणत असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील या दोन्ही शक्ती समांतर प्रक्रियेने काम करतात. या दोहोंमध्ये त्यांनी विसंवाद होऊ दिला नाही. त्यांच्यामधील कार्यकर्त्याने त्यांना लिहिण्यासाठी आत्मबल दिले. आत्मविश्वास दिला. समाजाभिमुख होण्याची अंतःप्रेरणा दिली.
डॉ. अनिल अवचटांनी सामाजिक चळवळींमध्ये स्वतःला झोकून दिले. तत्कालीन परिस्थितिजन्य घटक त्याला कारणीभूत ठरले. त्यांचा पिंडधर्म घडत असताना काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात ते आले. ऐन तारुण्यात समाजवादी विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, प्रा. ग. प्र. प्रधान आणि यदुनाथ थत्ते यांच्यासारख्या कृतिशील विचारवंतांचा सहवास त्यांना लाभला. त्यामुळे ‘साधना’ परिवारात ते समाविष्ट झाले. ‘वेध’ या सदरामधून आपल्या समाजाला ग्रासणार्या अनेक प्रश्नांसंबंधी ऊहापोह करणारे लेखन त्यांनी केले. त्यांचे विचार ज्वलंत स्वरूपाचे होते. ‘पुरोगामी सत्यशोधक’ या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांचा पाठपुरावा करणार्या त्रैमासिकाचेही काही काळ त्यांनी संपादन केले. डॉ. बाबा आढाव यांच्यासारखे कृतिशील सहकारी त्यांना त्या काळात लाभले. ‘हमाल पंचायत’ची उभारणी त्यांनी केली आणि या कामगारांच्या न्याय्य मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा केला.
‘पूर्णिया’ हे डॉ. अनिल अवचट यांनी सामाजिक जाणिवेने लिहिलेले पहिले पुस्तक. १९६९ मध्ये ते प्रसिद्ध झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे पंचवीस वर्षांचे होते. बिहारला पडलेल्या दुष्काळाच्या प्रसंगी तारुण्याच्या ऐन नव्हाळीत ते एस. एम. जोशी यांच्याबरोबर जाऊन आले. तत्कालीन बिहारची परिस्थिती काय होती? लोकशाही मूल्यांचा उच्चार नावापुरता. प्रत्यक्षात जमीनदार संस्कृती अंगात भिनलेली. जातीयवादाने समाज पोखरलेला. सर्वसामान्यांची जनता भिकेला लागलेली. सर्वत्र अराजक… सर्वसामान्यांची होणारी ससेहोलपट. सर्वंकष राजसत्तेमुळे जनतेवर निरंकुश सत्ता कशी चालू शकते याचा तो नमूना. केवळ बिहारपुरतीच ही परिस्थिती होती असे नव्हे, ती सार्या उत्तर भारताची व्यथा होती. एकेकाळी लिच्छवीचे वैभवशाली गणतंत्र बिहारमध्ये होते. स्त्रियांना पुरुषांबरोबर समान हक्क होते. पण नंतरचा पूर्णिया जिल्हा हा विषमतेचे आणि भ्रष्टाचाराचे केंद्र होऊन बसला. डॉ. अवचटांनी एका कटू सत्यावर प्रकाशझोत टाकला आहे. ‘‘एक तर तिथल्या वरच्या वर्गाविरुद्ध प्रत्यक्ष असा लढा क्वचित दिला गेला, जो दिला असेल तो अल्पजीवी ठरला, जमीनदारांनी मोडून काढला. सर्वोदयाच्या पायात जमीनदारांनी केव्हा शृंखला अडकवल्या हे त्यांनाही कळले नाही.’’
ते पुढे म्हणतात ः
‘‘बिहारचे आंदोलन हे जसे श्रीमंतांविरुद्ध तेवढेच किंवा त्याहून प्रखर प्रमाणात गरिबांविरुद्ध, त्यांच्या मनातल्या फ्लूडल कल्पनांविरुद्ध लढावे लागणार आहे. आणि हे दुसरे फार कठीण आहे. कारण परंपरांचा ‘उज्ज्वल’ वारसा मोठा आहे. पुन्हा हा पडला गंगाजमुना, तीर्थक्षेत्रांचा देश.’’ यावर वेगळे भाष्य करण्याची आवश्यकता नाही. डॉ. अवचटांनी आपल्या सामाजिक संवेदनेने केलेल्या लेखनात हा स्पुल्लिंग सातत्याने जपला.
डॉ. अवचटांचा लेखनप्रवास गेल्या अर्धशतकात चालू आहे. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. आपली गुणवत्ता त्यांनी टिकवून ठेवली. जीवनाच्या अंगप्रत्यंगाला स्पर्श करताना त्यांच्या प्रज्ञेला आणि प्रतिभेला नवीन धुमारे फुटत राहिले. लेखन कुठल्याही प्रकारचे असो, त्यातील समाजचिंतनाचे अंतःसूत्र कुठेही सुटत नाही. त्यांचा समाजहितैषी दृष्टिकोन लोप पावत नाही. उत्कट सामाजिक जाणिवेने त्यांनी हे लेखन केले; पण त्यात बोधवादाचा लवलेश नाही. प्रखर वास्तवावर कुणाची भीडमुर्वत न ठेवता युक्रान्दच्या दिवसांत घणाघाती प्रहार केले. पण त्याला वैयक्तिक विद्वेषाचे स्वरूप येऊ दिले नाही. उभ्या-आडव्या महाराष्ट्रात त्यांनी सर्वत्र संचार केला. मूलभूत समस्यांशी झोंबी घेण्याचे त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे. या त्यांच्या नवनिर्माणाच्या कार्यात अनेक अडथळे आले. पण त्यांची निष्ठा अविचल राहिली. त्यांच्या इच्छित कार्यात समानधर्मे सहकारीही त्यांना लाभले. स्वातंत्र्योत्तर भारतात सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात आढळून येणार्या विषमतेमुळे त्यांचे मन संत्रस्त झाले. या क्षेत्रात ज्या अनिष्ट गोष्टी घडल्या, त्यांच्याकडे आणि त्या घडवून आणणार्या शक्तींकडे त्यांनी अभ्यासाच्या नजरेने पाहिले. माणसांच्या वृत्तिप्रवृत्तींचा शोध घेतला. समाजात बोकाळलेल्या बुवाबाजीवर, अंधश्रद्धांवर हल्ला चढविला. समाजातील दुबळ्या आणि अभावग्रस्त घटकांविषयी, दुष्काळग्रस्त माणसे, झोपडपट्टीतील माणसे, भटक्या जमातीतील माणसे, विडी कामगारांचे ओढगस्तीचे जीवन यांविषयी त्यांनी सतत कणव बाळगली.
पानी सा निर्मल हो| मेरा मन
धरती सा अविचल हो| मेरा मन
या ‘मुक्तांगण’च्या प्रार्थनेतून त्यांच्या जीवनमंत्राचे गुंजन ऐकायला मिळते. ध्येयनिष्ठेचे दर्शन घडते. त्यांच्या ‘अंधेरनगरी निपाणी’, ‘छेद’, ‘माणसं’, ‘संभ्रम’, ‘वाघ्यामुरळी’, ‘कोंडमारा’, ‘गर्द’, ‘वेध’, ‘धागे आडवे उभे’, ‘धार्मिक’ व ‘कार्यरत’ या त्यांच्या पुस्तकांमधून त्यांच्या समाजमनस्क वृत्तीचे दर्शन घडते. या सर्वच पुस्तकांतील आशयसूत्रांचा थोड्या अवकाशात वेध घेणे ही कठीण गोष्ट आहे. यांतील ‘कार्यरत’ हे पुस्तक वेगळ्या धाटणीचे आहे हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. सर्वत्र अंधकार असताना प्रकाशाची रुजवण करणारी काही अपवादभूत माणसे असतात म्हणून तर हे जग चाललेले आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील सुरेखा दळवी, नाशिकचे काका चव्हाण, सावित्री मार्ग- महाडचे डॉ. हिम्मतराव बावस्कर, सप्तपूर- धारवाडचे एस. आर. हिरेमठ, प्रयोग परिवार- अंकोलीचे अरुण देशपांडे आणि गडचिरोलीचे डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग, त्यांचे ‘सर्च’ केंद्र यांच्या रूपाने सकारात्मक अनुभूतीने रचनात्मक कार्य करणार्या आशादीपांचे डॉ. अवचटांना दर्शन घडले. त्यांच्याविषयी त्यांनी किती समरसतेने लिहिले आहे. हमीद दलवाई यांचे ‘हमीद’ हे त्यांनी लिहिलेले चरित्र या दृष्टिकोनातून वाचायला हवे.
डॉ. अनिल अवचट यांच्या लेखनातील दुसरी धारा आहे ती स्वविषयक जाणिवांची. ती अत्यंत तरल अनुभूतींची, अभिरूचिसंपन्न स्वरूपाची आहे. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे छंद जोपासणारा अवलिया आहे. त्याचे दर्शन ‘छंदाविषयी’ या पुस्तकात घडते. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून डॉ. अवचटांच्या मनाची धारणा कळते. ते म्हणतात ः
‘‘प्रत्येक माणसात काहीतरी नवं शिकण्याची, अवगत करून त्यातला आनंद घेण्याची क्षमता आहे… माझी अशी खात्री आहे की, निसर्गाने प्रत्येकाला हे कलागुण दिलेलेच आहेत. त्यांच्याकडे बघणे, ते वाढवणे, त्याला अग्रक्रम देणे हे आपल्या हातात आहे. त्याचा निर्भेळ आनंद लुटण्यासाठी त्याच्यातून पैसा मिळवण्यापासून किंवा कीर्तीच्या विचारापासून दूर राहिलं तर बरंच.’’
या पुस्तकात त्यांनी चित्रकला, पाककला, ओरिगामी, फोटोग्राफी, लाकडातील शिल्प, बासरीवादन, वाचन आणि अन्य छंदांबद्दल अतिशय समरसतेने लिहिले आहे. त्यांनी हत्तींची, झाडांची, मोरांची, आगळ्या-वेगळ्या आकारात साकार झालेल्या माणसांची चित्रे काढली. ज्या कलेला त्यांनी हात लावावा आणि त्याचे सोने व्हावे असे डॉ. अवचटांच्या बाबतीत घडत गेले. याच तन्मय वृत्तीने त्यांनी अनेक कलांची साधना केली आणि तेवढ्याच तन्मयतेने तिच्याविषयी लिहिलेदेखील. एक सर्जनशील कलावंत म्हणून त्यांनी स्वतःची नाममुद्रा निर्माण केली आहे. हे सारे मोकळेपणाने, गोष्टीवेल्हाळ वृत्तीने सांगणारा लेखक आपोआपच आपला सुहृद होऊन जातो. ‘माझी चित्तरकथा’ हादेखील त्यांच्या समृद्ध प्रवासातील महत्त्वपूर्ण अध्याय आहे. न लिहिलेल्या आत्मचरित्रातील एक प्रकरण आहे.
‘स्वतःविषयी’, ‘जगण्यातील काही’, ‘शिकविले ज्यांनी’, ‘दिसले ते’ आणि ‘जिवाभावाचे’ ही पुस्तके आत्मपर आहेत. ती सलगपणे वाचली तर अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती आस्वादता येते. एका विलोभनीय व्यक्तिमत्त्वाचे अंतरंगदर्शन त्यातून उलगडत जाते. डॉ. अनिल अवचट सर्वांगानी समजून घेण्यासाठी ही पुस्तके उपयुक्त तर आहेतच, पण प्रांजळ, पारदर्शी कसे लिहावे, आत्मविलोप कसा करावा याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे. या लेखकाचे बालपण, जडणघडण, सहवासात आलेली अनेकविध क्षेत्रांतील समृद्ध व्यक्तिमत्त्वाची माणसे, संघर्षमय जीवन असतानाही अभिरूची कशी जोपासावी याचे संस्कार सहजतेने मनावर होत जातात. हा माणूस आदर्श असूनही दूरस्थ वाटत नाही. ‘पुण्याची अपूर्वाई’ हे पुस्तक काहीसे वेगळे असले तरी अंशतः पुणे हेदेखील त्यांच्या जडणघडणीस कारणीभूत ठरलेले आहे.
‘बहर शिशिराचा’ आणि ‘अमेरिका’ ही दोन्ही अमेरिकेविषयीची पुस्तके असली तरी त्यांचे दृष्टिकोन भिन्न आहेत. ‘बहर शिशिराचा’मध्ये उत्तम फोटोग्राफी आणि लेखकाची काव्यात्म शैली यांचा स्वरसंगम झाला आहे. ‘अमेरिका’ या पुस्तकात विचक्षण वृत्तीने टिपलेली समाजनिरीक्षणे आहेत. ‘मोर’ या ललित निबंधसंग्रहातील लेखन चिरप्रसन्नतेचा प्रत्यय देणारे आहे.