- मीना समुद्र
गोल, टपोरे, तजेलदार कांतीचे आंबटतुरट चवीचे हे फळ म्हणजे अमृतफळच. कुठल्याही रोगाचा प्रतिकार करणारे आणि पचनशक्ती, प्रतिकारशक्ती वाढवणारे हे आवळे म्हणजे रोगाविरुद्ध झुंज देणारे मावळेच की! तेव्हा आजच्या काळात हे ‘मावळे’ आपल्या पदरी जरूर ठेवावेत.
यंदाचा तुळशीविवाह सर्वत्र मोठ्या उत्साहाने पण एरव्हीपेक्षा थोड्या कमी धामधुमीने संपन्न झाला. अंगणाअंगणांतून छानशी रंगविलेली तुळशीवृंदावने दिसत आहेत, आणि त्यांत नाजूक, जांभळट, पांढरट पोपटी फुलांच्या मंजिर्यांनी, हिरवट काळसर किंवा नुसत्याच हिरव्यागार पानांनी तरारलेल्या, डवरलेल्या, फुलारलेल्या तुळशी डोलताना दिसत आहेत. कृष्णाबरोबर विवाह झाल्यानं हिरवा चुडा आणि मणिमंगळसूत्र ल्यालेल्या नव्या नवरीचं तेज अंगोपांगावरून झळकत आहे. मन प्रसन्न करणार्या मंद गंधाची लहर वार्याच्या मंद झुळकीबरोबर वातावरणात उठते आहे आणि तिच्या सान्निध्यात असलेल्या सार्यांना जाणवत आहे. सारवलेली, सडा शिंपलेली, रांगोळ्यांनी सुशोभित अंगणातली जमीन आणि त्यावरचं तुळशीवृंदावन हीच विवाहवेदी. तिच्यावर उसाचं मखर बांधलेलं आहे आणि मातीवर तुळशीच्या मुळाशी चिंचेचे आकडे आणि टपोरे आवळे ठेवले आहेत. आंतरपाट, अक्षता, काडवातींची ओवाळणी, आणि या लग्नाने आनंदित झालेल्या सर्वांना चुरमुरे, पोहे आणि गोडधोड काही प्रसाद. सर्वत्र लखलखणार्या दिव्यांतून सांजसमयी विवाहाला उपस्थित राहिलेली वैभवलक्ष्मी. या सार्या खुणा मनात रेंगाळत असतानाच एक नेहमीची शंका मनात उभी राहिली की तुळशीच्या मुळाशी आवळे आणि चिंचा कशासाठी ठेवतात? मात्र यावेळी याचं उत्तर मनानंच दिलं- वनस्पतीच्या विवाहाला वनस्पतीच नकोत का असायला? त्याही तिच्याइतक्याच, तिच्यासारख्याच बहुगुणी, मानवोपकारी?
दुसरीकडून असंही वाटलं की चिंच आणि आवळी या तुळशीच्या मैत्रिणी शोभतात. आवळी आणि चिंचेची बारीक बारीक नाजूक पानं तर आवळीची तशाच ठेवणीची पण किंचित मोठी. जणू या दोघी बहिणी-बहिणीच वाटाव्यात अशा. या थंडीच्या दिवसांत आमचा यथायोग्य उपयोग करा आणि आरोग्य सांभाळा हेच जणू या तिघी सांगताहेत आपल्याला.
भारतीय संस्कृतीत वृक्षपूजा अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. कारण निसर्गाबद्दल श्रद्धा आणि कृतज्ञता राखणे ही आपली परंपरा आहे. आजकाल आपण निसर्गापासून दूर जातच आहोत आणि आपल्याला सदैव साथ देणार्या सृष्टीचा नाना मार्गांनी संहार करत आहोत; कळत-नकळत विनाश घडवून आणत आहोत. वटवृक्ष, अशोक, पिंपळ, कडुलिंब असे वृक्ष म्हणजे सृष्टीचे मानवाला मिळालेले वरदान आहे. पुराणकाळच्या ऋषिमुनींनी हे कधी अंतर्ज्ञानाने तर कधी प्रयोगांनी जाणले आणि त्यांनी वृक्षपूजन सुरू केले. अशा वृक्षातलाच एक अत्यंत महत्त्वाचा वृक्ष म्हणजे आवळीचा वृक्ष.
आवळीच्या वृक्षात तर प्रत्यक्ष देवांचा वास असतो. मृद्मान्य नावाच्या राक्षसाने प्रत्यक्ष देवांना सळो की पळो करून सोडल्यावर त्यांनी पृथ्वीवर धाव घेऊन या वृक्षाचा आधार घेतला. त्यामुळे देव प्रबोधिनी एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कार्तिक महिन्यात आवळीवृक्षपूजन केले जाते. काही ठिकाणी मंदिरातून निघणारी देवाची पालखी तिच्याखाली ठेवून सर्वत्र दिवे उजळले जातात. संध्याकाळी ती पालखी पुन्हा मंदिरात नेली जाते. देवांचे वास्तव्य असलेल्या आवळीची पूजा करून तिची प्रार्थना केली जाते-
धारिदेवी नमस्तुभ्यं सर्वपापक्षयंकरी
निरोगं कुरु मा नित्यं निष्पापं धात्रि सर्वदा
म्हणजेच ‘हे आवळी, तू सर्व पापांचा क्षय करणारी आहेस. तुला प्रणाम असो. तू सर्वदा आम्हाला निरामय, निष्पाप कर.’ ही प्रार्थना म्हणजे आवळीचा गुणगौरव आहे. कारण तिच्या फळात म्हणजे आवळ्यात ‘सी’ जीवनसत्त्वाचे आगर आहे आणि याचाच अर्थ ते फळ आरोग्याचं प्रचंड मोठं भांडार आहे. आयुर्वेदात तर ‘बहुगुणी’ म्हणून याचा उल्लेख आहे. केवळ वृक्षसान्निध्यामुळेही शुद्ध हवा आपल्याला अनायास मिळते, त्यामुळे या कार्तिक महिन्यात अशा सुफल आवळीखाली भोजन करण्याची प्रथा आहे. त्याला ‘आवळीभोजन’ असंच संबोधलं जातं. मग तो वृक्ष एखाद्या मंदिरप्रांगणात असो, बाग-उद्यानात असो की नदीकाठी असो. आवळीवृक्षपूजनाने भूत-पिशाच्च बाधा होत नाही अशीही एक समजूत आहे. आरोग्यसंपन्नता प्राप्त झाली की धट्ट्याकट्ट्या मनाला मग असल्या शंकाकुशंका ग्रासणार नाहीतच. आवळीभोजन, चांदणीभोजन, वृक्षपूजन हे सारे विधी आपल्याला आपोआप निसर्गाकडे घेऊन जातात आणि अगदी परंपरेचे सोपस्कार असे जरी आमच्या पिढीला ते वाटले तरी ते निवांत शांतता, प्रसन्नता, आनंद आणि आरोग्य देतात. त्यामुळे ते सणा-उत्सवांच्या निमित्ताने का होईना, साजरे व्हायलाच हवेत; सदासर्वकाळ सोयीसवडीनुसार का होईना करायला हवेत हे स्वानुभवाने सांगत आहे. असा हा आवळा कोणत्याही स्वरूपात खावा असे आई नेहमी म्हणे. आताच्या काळात मिळणारे च्यवनप्राश, आमला सिरप वगैरे तेव्हा सर्रास मिळत नसत. पण या एकदोन महिन्यांतच दृष्टीला पडणारे हे आवळे साप्ताहिक बाजारातून आणले जात. हे डोंगरी आवळे अतिशय सुंदर कांती, भरपूर गराचे, रसाळ असत. मीठ लावून ते करकरीत आवळे टॉकटॉक करत खाऊन वर पाणी पीत असू. ते गोड लागे. मग ‘आवळा खाऊन पाणी पिऊन माहेरला जावे आणि गाजर खाऊन पाणी पिऊन सासरला जावे’ अशी आजीची मल्लिनाथी आठवे. दात आंबले तरी पर्वा नसे. असे आणलेले आवळे मग चोचवून, त्याचा मोरावळा किंवा पाकात कीस शिजवून केलेला मोरांब्यासारखा झटपट मोरावळा; ताजं-ताजं ४-६ दिवस टिकणारं लोणचं; मीठमिरचीबरोबर कीस घालून केलेला ठेचा; पाकवून किंवा मीठ घालून वाळवलेले खांडे; किसून जिरेमीठ लावून वाळवलेली सुपारी; आवळे शिजवून त्याच्या पाकळ्या चटकन बीपासून सुटून आल्या की त्यात वाटून जिरेपूड, काळं मीठ घालून थापलेले आणि वाळवलेले गोल तुकडे; साखरेच्या पाकात लगदा घालून केलेलं सरबत- असे नाना प्रकार व्हायचे आवळ्याचे.
आवळ्याची (गोल गरगरीत आकारामुळे असेल) मोट बांधता येत नाही असा एक वाक्प्रचार आहे. विखुरलेले गोळा करून त्याची गठडी बांधायची हे थोडे कठीण काम वाटत असावे. पण बाजारात या दिवसांत आवळ्यांनी शिगोशीग भरलेल्या पाट्या दिसतात तेव्हा पाय आपोआप तिकडे वळतात. पूर्वी वास्को-मिरज रेल्वेने जाताना खानापूर वगैरे छोट्यामोठ्या स्टेशनांवर चारआठ आण्यात छोट्या टोपल्या भरून घेतलेले आवळे आठवतात. गोल, टपोरे, तजेलदार कांतीचे आंबटतुरट चवीचे हे फळ म्हणजे अमृतफळच. पूर्वी पण पी. टी. कॉलनीत राहात असताना बेळगावकडून एक पेटी भरून एक आवळे विकणारा यायचा. ‘आवळे घेता का आवळे’ हे शब्द त्याच्या मधल्या ‘अम्’मुळे आवळ्याचे ‘मावळे’ ऐकू यायचे. मग वाटले कुठल्याही रोगाचा प्रतिकार करणारे आणि पचनशक्ती, प्रतिकारशक्ती वाढवणारे हे आवळे म्हणजे रोगाविरुद्ध झुंज देणारे मावळेच की! तेव्हा आजच्या काळात हे ‘मावळे’ आपल्या पदरी जरूर ठेवावेत. या अमृतफळाचं वरदान सार्यांना लाभो, हीच इच्छा!