>> कॉंग्रेस शिष्टमंडळाचे राष्ट्रपतींना साकडे
दिल्लीतील जातीय हिंसाचारप्रकरणी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनवर भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या दंगलीप्रकरणी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला राज धर्म पाळण्याचे निर्देश द्यावेत असे साकडे या शिष्टमंडळाने त्यांना घातले. तसेच याप्रकरणी अपयश आल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राजिनामा देण्यास सांगावे अशी विनंती या निवेदनाद्वारे केल्याचे सोनिया गांधी यांनी नंतर राष्ट्रपती भवनाबाहेर प्रसारमाध्यमांना सांगितले.
जातीय दंगल शमविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी केंद्र सरकार तसेच दिल्ली सरकार यांनी मुक्या बघ्याची भूमिका घेतली याकडे या निवेदनाद्वारे राष्ट्रपतींचे लक्ष वेधल्याचे गांधी म्हणाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना याप्रकरणी योग्य भूमिका बजावण्यात अपयश आल्याने राष्ट्रपतींनी तातडीने त्यांना पदावर बडतर्फ करण्याचे निर्देश द्यावेत असे या कॉंग्रेसने निवेदनात नमूद केले आहे.
या शिष्टमंडळात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, आनंद शर्मा, ए. के. अँटर्नी, कुमारी सेलजा, रणदीप सूरजेवाला, पी. चिदंबरम आदींचा समावेश होता.
या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अपयशावर भाष्य करताना गांधी म्हणाल्या, जेव्हा ईशान्य दिल्लीत हिंसाचाराचा वणवा पेटला होता तेव्हा अमित शहा कोठे होते? या गंभीर प्रकरणात लक्ष घालण्यास शहा यांना वेळ न मिळण्याइतपत गेल्या रविवारी ते कोणत्या महत्त्वाच्या कामात व्यस्त होते असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी नुकतेच पुन्हा सत्तेवर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री याप्रश्नी काही तरी करत असल्याचे अजिबात पहायला मिळाले नाही असे त्या म्हणाल्या. एवढ्या भीषण कांडाचा थांगपत्ता गुप्तचर यंत्रणेला लागला नाही हे मोठे धक्कादायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.