अमित शहांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल

0
5

>> पोलीस महासंचालकांच्या बदलीचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी

आसगाव येथे प्रदीप आगरवाडेकर यांचे घर जमीनदोस्त करण्याच्या प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेले राज्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या बदलीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच काल मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्लीत दाखल झाले. ते आपल्या या दिल्ली दौऱ्यात या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी या प्रकरणी चर्चा करतील.

प्रदीप आगरवाडेकर यांचे घर जमीनदोस्त करण्याच्या प्रकरणामुळे जसपाल सिंग हे अत्यंत वादग्रस्त ठरलेले असून, त्यांच्याच सूचनेवरून आगरवाडेकर यांचे घर पाडण्यासाठीच्या हालचालींना वेग आला होता. आणि हणजूण पोलिसांवरही त्यांनी दबाव आणल्याचे स्पष्ट झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे काल दिल्लीकडे रवाना झाले.

गोवा भाजप मुख्यालयाच्या भूमिपूजनासाठी नड्डा यांना निमंत्रण
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची नवी दिल्लीत काल भेट घेतली. त्यांना गोवा भाजप मुख्यालयाच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण दिले. यावेळी अध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.