अमित पालेकर यांची तिसऱ्यांदा चौकशी

0
2

>> सिद्दिकी खान पलायन प्रकरणात जुने गोवे पोलिसांकडून दोन तास चौकशी

सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याच्या पलायन प्रकरणामध्ये आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांची जुने गोवे पोलिसांनी काल तिसऱ्यांदा दोन तास चौकशी केली. पोलीस यंत्रणेकडून आपण विरोधी पक्षातील असल्याने चौकशीच्या नावाखाली सतावणूक केली जात आहे, असा आरोप ॲड. पालेकर यांनी चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना काल केला.

जुने गोवे पोलिसांनी संशयित आरोपी सिद्दिकी खान याच्या विरोधात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बुधवारी उपस्थित राहण्याची नोटीस ॲड. अमित पालेकर यांना बजावण्यात आली होती.

जुने गोवे पोलिसांनी काल ॲड. अमित पालेकर यांची सुमारे दोन तास चौकशी केली. सिद्दिकी हा आयआरबी शिपाई अमित नाईक याच्या मदतीने रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून पळून गेला होता. हुबळी येथे सिद्दिकीने अमित नाईक याला पिस्तुलाचा धाक दाखविला होता, अशी माहिती उघड झाल्यानंतर सिद्दिकीविरोधात शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून ॲड. पालेकर यांना नोटीस बजावली होती
सिद्दिकी खान हा गुन्हा अन्वषेण विभागाच्या पोलीस कोठडीतून पळून गेला होता. तसेच, त्याने जारी केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जुने गोवे पोलिसांनी गुन्हा अन्वेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करायला हवी होती. ते सोडून आपण विरोधी पक्षातील असल्याने आपल्याला चौकशीसाठी पुन्हा पुन्हा बोलावून सतावणूक केली जात आहे, असा आरोप ॲड. पालेकर यांनी केला.