अमित पालेकर यांचा जामीन रद्द

0
6

>> बाणास्तारी अपघात प्रकरणी पुन्हा अटक होणार

>> जामिनावेळी घातलेल्या अटी-शर्थींचा केला भंग

गेल्या वर्षी दि. 6 ऑगस्ट रोजी झालेल्या बाणास्तारी अपघाताला आता वेगळे वळण आले आहे. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आपचे नेते ॲड. अमित पालेकर यांनी विदेशात जाण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली नसल्याने अडचणीत आले आहेत. सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुन्हा अन्वेषण विभागाच्या अर्जावर निर्णय देताना अमित पालेकर यांचा जामीन रद्द करण्याचा आदेश दिला. त्यामुळे त्यांना या प्रकरणात आता कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, बाणास्तारी अपघात प्रकरणात अमित पालेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा अपघात घडण्यापूर्वी त्यांनी कुटुंबीयांसह फ्रान्सच्या दौऱ्यासाठी तिकिटे बुक केली होती. त्यानंतर अमित पालेकर यांनी न्यायलयाची परवानगी घेऊन फ्रान्स दौरा केला. मात्र यानंतर न्यायालयाची परवानगी न घेता त्यांनी अन्य काही देशांचाही दौरा केला. त्यामुळे जामीन देताना घातलेल्या अटी-शर्थींचा भंग झाला. परिणामी गुन्हा अन्वेषण विभागाने अमित पालेकर यांचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

अमित पालेकर राजकीय क्षेत्रात वावरत असल्याने हा अर्ज दाखल करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा शनिवारी झालेल्या सुनावणीत त्यांच्या वकिलांनी केला होता; परंतु काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पालेकर यांचा जामीन अर्ज रद्द केला. त्यामुळे त्यांना पुन्हा अटक केली जाणार आहे.

अटकेसाठी हालचाली सुरू
फोंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बाणस्तारी अपघात प्रकरणामध्ये ॲड. अमित पालेकर यांचा जामीन रद्द केल्यानंतर गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांना अटक करण्यासाठी हालचाली सुरू केल्या पोलीस पथकाने काल सायंकाळी पालेकर यांच्या घराला भेट दिली; पण त्याठिकाणी ते सापडू शकले नाहीत. ते फरार झाले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.