अमित पालेकरांना हायकोर्टाचा दिलासा

0
8

>> बाणास्तारी अपघात प्रकरणात जामीन कायम; कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बाणास्तारी भीषण अपघात प्रकरणामध्ये ॲड. अमित पालेकर यांना काल मोठा दिलासा दिला. जामीन रद्द करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरवला.

फोंडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बाणस्तारी अपघात प्रकरणामध्ये ॲड. अमित पालेकर यांना दिलेला जामीन रद्द करणारा आदेश सोमवारी जारी केला होता. त्यामुळे ते अडचणीत आले होते. पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न चालविले होते.
ॲड. पालेकर यांनी गोवा खंडपीठात मंगळवारी याचिका दाखल करून कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. गोवा खंडपीठात या याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली.

अमित पालेकर यांनी परदेशात जाऊन न्यायप्रक्रियेत अडथळा आणला नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील ॲड. नितीन सरदेसाई यांनी युक्तिवाद केला.

आपण न्यायालयाच्या जामीन अटीचे उल्लंघन केलेले नाही, असे ॲड. अमित पालेकर यांनी ‘आप’च्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आपण काहीही चुकीचे केलेले नाही. आपला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. आपण एक वकील असून न्यायालयाच्या अटीचे उल्लंघन करण्याची चूक कधीही करू शकत नाही, असेही ॲड. पालेकर यांनी सांगितले. यावेळी वाल्मिकी नाईक यांची उपस्थिती होती.