अमिताभ बच्चनहस्ते इफ्फीचे उद्घाटन

0
92

आतापर्यंत २२३७ प्रतिनिधींची नोंदणी
पणजी (न. प्र.)
नोव्हेंबर महिन्यात गोव्यात होणार्‍या इफ्फी महोत्सवाचे उद्घाटन दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याहस्ते होण्याचे जवळ जवळ निश्‍चित झाले असल्याचे गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.
बच्चन यांच्या हस्ते इफ्फीचे उद्घाटन व्हावे असे ईएसजीबरोबरच चित्रपट महोत्सव संचालनालयालाही वाटत आहे. त्यामुळे उद्घाटक म्हणून अमिताभ बच्चन यांना आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे नाईक म्हणाले.
दरम्यान, यंदा इफ्फीच्या प्रतिनिधींची संख्या १३ हजारांवर जाण्याची शक्यता दामू नाईक यांनी व्यक्त केली. प्रतिनिधी नोंदणी यापूर्वीच सुरू झालेली असून आतापर्यंत २२३७ जणांनी नोंदणी केली आहे.
यंदा इफ्फीत मराठी व कोकणी चित्रपटांसाठी वेगळा विभाग स्थापन करण्याचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो या प्रादेशिक भाषांतील चित्रपटांना वाव मिळावा यासाठी आहे असे सांगून गोमंतकीय चित्रपटांना या विभागामुळे न्याय मिळू शकेल, असे ते म्हणाले. गोवा हे इफ्फीसाठीचे कायमस्वरूपी स्थळ बनल्याने व त्यावर हल्लीच शिक्कामोर्तब झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा इफ्फी जरा वेगळा असावा असे ईएसजीला वाटत असून त्यासाठी जे काही करणे शक्य आहे ते केले जाणार असल्याचे दामू नाईक यांनी काल अनौपचारिकरित्या पत्रकारांशी बोलताना सांगितले.