बांबोळीतील डॉ. मुखर्जी स्टेडियम सज्ज : रजनीकांत यांचीही उपस्थिती
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तथा इफ्फीचे आज संध्या. ४ वाजता बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये एका शानदार सोहळ्यात उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिग्गज सिने अभिनेते अमिताभ बच्चन हे हजर राहणार आहेत. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत हेही यावेळी हजर असतील. पोलंडचे चित्रपट निर्माते झानुसी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील.उद्घाटन सोहळ्याला सुमारे ५ हजार प्रेक्षक व इफ्फीचे प्रतिनिधी हजर असतील. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन बॉलिवूडमधील चरित्र अभिनेते अनुपम खेर व अभिनेत्री रवीना टंडन करतील. उद्घाटन सोहळ्यानंतर अभिनेत्री व नृत्यांगना शोभना पिल्ले यांच्या संकल्पनेतून तयार झालेला नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.
अमिताभ हस्ते उद्घाटन
इफ्फीच्या पूर्वसंध्येला काल ईएसजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत चित्रपट महोत्सव संचालनालयाचे संचालक शंकर मोहन यांनी इफ्फीविषयीची सविस्तर माहिती दिली. यंदा इफ्फीचे उद्घाटन अमिताभ बच्चन यांच्याहस्ते होणार असून यावेळी त्यांची पत्नी व सुप्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन याही हजर असतील. शतक महोत्सवानिमित्त देण्यात येणारा पुरस्कार गेल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना देण्यात आला होता. यावेळी तो पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात येणार आहे. २१ रोजी रजनीकांत यांचा ‘कोचीदियान’ हा चित्रपट कला अकादमीत दाखवण्यात येणार असून त्यावेळी रजनीकांत हे हजर रहावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मोहन म्हणाले.
१२,७०० प्रतिनिधी नोंद
यंदा महोत्सवासाठी १२,७०० प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. आंतरराष्ट्रीय विभागासाठी यंदा ६४० चित्रपट आले होते. त्यापैकी १७८ चित्रपटांची निवड करण्यात आलेली असून ७९ देशातील हे चित्रपट आहेत. ऑस्करसाठी नामांकन झालेले २८ चित्रपट इफ्फीत दाखवण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय व आशियायी मिळून एकूण २० चित्रपटांचा प्रिमियर इफ्फीत होणार आहे. तर ९१ भारतीय चित्रपटांचाही प्रिमियर होणार आहे. यंदाच्या इफ्फीत चीनी चित्रपटांवर प्रकाशझोत असेल.
सार्क देशातील चित्रपट
यंदा इप्फीत सार्क देशातील चित्रपट हा नवा विभाग तयार करण्यात आलेला आहे. त्यात प्रत्येक सार्क देशातील एक मिळून एकूण आठ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
एनिमेशन हा नवा विभागही यंदा सुरू करण्यात आलेला असून त्यात ६ चित्रपट दाखवण्यात येतील.
रिस्टोर विभाग
रिस्टोर म्हणजे अत्यंत जुने व प्रिंट्स खराब झालेले चित्रपट पण तंत्रज्ञानाचा वापर करून ते ठीक करण्यात आलेल्या चित्रपटांचा रिस्टोर विभाग करण्यात आलेला असून या विभागात चार चित्रपट दाखवण्यात येणार असून त्यात चार्ली चॅपलीन व फ्रँको ट्रुफो यांचे चित्रपट दाखवण्यात येतील.
चालू वर्षी दिवंगत झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली विभागातून ११ दिवंगत कलाकारांचे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. या विभागात ९ मोठ्या प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शकांचे चित्रपट दाखवण्यात येणार असून शाम बेनेगल, अदूर गोपालकृष्णन्, गोविंद निहलानी, मृणाल सेन आदींचे चित्रपट या विभागात दाखवण्यात येणार आहेत.
कोकणी विभाग
यंदा गोमंतकीयांनी केलेले चित्रपट दाखवण्यासाठी कोकणी-मराठी विभागाची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी एक पूर्ण लांबीचा कोकणी चित्रपट ‘इन सर्च ऑफ अ मदर’ व दोन शॉर्ट फिल्मस ‘पाकलो’ (दिग्दर्शन – आफताब खान) व निरागस (दिग्दर्शक – आशिष नागवेकर) यांच्या चित्रपटांची निवड झाली आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या वर्षी १०० वर्षांतील उत्कृष्ट असे संगीतमय चित्रपट दाखवण्यात आले होते. यंदा नृत्याला महत्त्व दिलेले २४ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झालेले दिग्दर्शक गुलजार यांच्या चित्रपटांचाही एक विभाग असून त्यात त्यांचे आठ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
यंदा इफ्फीला गुलजार, मनोज वाजपेयी, बुद्धदेव दासगुप्ता, विशाल भारद्वाज, शाम बेनेगल, गोविंद निहलानी, सुभाष घई, अदूर गोपालकृष्णन्, टिनू आनंद, नाना पाटेकर, शेखर कपूर, कौशिक गांगुली, रसुल मुक्कुटी आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत. इफ्फीनिमित्त काही कलाकारांच्या मास्टर क्लासेसचेही आयोजन करण्यात आलेले असून शेखर कपूर यांचा अशाच प्रकारचा एक मास्टर क्लास होणार आहे.
३१० चित्रपट
इफ्फीत यंदा ३१० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यावेळी बोलताना ईएसजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सातार्डेकर म्हणाले की, प्रतिनिधींना चित्रपटगृहात जाण्यासाठी उन्हात रांगेत उभे रहावे लागते यासाठी यंदा वातानुकुलीत मंडप आयनॉक्ससमोर उभारण्यात आला आहे. गोमंतकीय कला दिग्दर्शक सुशांत तारी यांनी इफ्फी स्थळी केलेली सजावट हेही यंदाच्या इफ्फीचे एक खास आकर्षण ठरणार असल्याचे ते म्हणाले.
कांपालवर चित्रपट प्रदर्शन
दरम्यान, यंदा पणजीतील लोकांसाठी रोज संध्याकाळी ७.३० वा. कांपाल मैदानावर खुल्या जागेत चित्रपट दाखवण्याची सोय करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.