अमली पदार्थ प्रकरणात भारती सिंग व पतीला जामीन

0
257

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक झालेली विनोदी अभिनेत्री भारती सिंग व पती हर्ष लिंबाछिया यांना विशेष अमलीपदार्थ विरोधी न्यायालयाने काल जामीन दिला. रविवारी न्यायालयाने भारती व तिच्या पतीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. मात्र, काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना जामीनमुक्त केले.

अमलीपदार्थविरोधी विभागाने भारती हिला शनिवारी अटक केली होती, तर तिच्या पतीला रविवारी सकाळी अटक करण्यात आली होती. त्यांच्या अंधेरीतील निवासस्थानी गांजा आढळून आल्यानंतर आधी भारती हिची चौकशी झाली होती व त्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. रविवारी दुपारी दोघांनाही न्यायदंडाधिकार्‍यांपुढे हजर करण्यात आले होते. भारतीच्या घरी ८६.५ ग्रॅम गांजा आढळला होता, ज्याला अमली पदार्थविषयक परिभाषेत कमी प्रमाण मानले जाते. त्यासाठी शिक्षाही कमी असते. १ हजार ग्रॅमपर्यंतचा गांजा कमी प्रमाण असल्याचे एनडीपीएस कायदा मानतो. त्यासाठी जास्तीत जास्त सहा महिने कैद आणि किंवा १० हजार रुपये दंड एवढीच शिक्षेची तरतूद आहे.