आकाशवाणीवरील ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांची घोषणा
अंमली पदार्थांच्या व्यसनात बुडालेल्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार लवकरच एक मोहीम राबवणार असून एक निःशुल्क मदतवाहिनीही स्थापन केली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रेडिओवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात राष्ट्राला संबोधित करताना केली. अमली पदार्थ सेवनाच्या या धोक्यापासून तरुणाईला मुक्त करण्यासाठी समाज आणि सरकार यांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘डार्कनेस, डिस्ट्रक्शन अँड डिव्हास्टेशन’ अशी ही ‘थ्रीडी’ समस्या असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काढले. अमली पदार्थंाच्या समस्येतून देश मुक्त करण्यासाठी सरकार मोहीम राबवील व त्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील तारे – तारकांना सामील करून घेईल असे त्यांनी सांगितले. अमली पदार्थांचे व्यसन हे विनाशकारी असल्याचे ते म्हणाले. ‘‘अमली पदार्थांचे व्यसन वाईट आहे, आपले मूल नव्हे’’असे त्यांनी पालकांना उद्देशून सांगितले. या समस्येच्या निराकरणासाठी कुटुंब, मित्रमंडळी, समाज, सरकार आणि कायदा यांनी एकत्रितरीत्या काम करावे लागेल असे त्यांनी पुढे सांगितले. ज्यांची मुले अमली पदार्थांच्या व्यसनाच्या विळख्यात सापडलेली आहेत, अशा कुटुंबांच्या दुःखाने आपण व्यथित झाल्याचे मोदी यांनी सांगितले.
‘‘मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्या हाताखाली काम करणारे अनेक अधिकारी माझ्याकडे रजा मागायला यायचे. रजा घेण्याचे कारण ते सांगत नसत, पण आग्रह केल्यावर कळे की त्यांची मुले अमलीपदार्थांच्या व्यसनात गुंतली आहेत. पंजाबमध्ये अशा अनेक असहाय्य व संतप्त माता आपल्याला भेटल्या, असेही मोदींनी सांगितले. मात्र अशा परिस्थितीत अमली पदार्थांना नाकारा, आपल्या मुलांना नव्हे, असा संदेशही मोदी यांनी दिला. ज्या युवकांचे आयुष्य ध्येयहीन बनलेले असते, असेच युवक अमली पदार्थांच्या व्यसनात ओढले जातात असे मोदी यांनी सांगितले. अमली पदार्थांवर आपण खर्च करीत असलेले पैसे कुठे जातात याचा कधी विचार आपण केला आहे का, असा सवाल त्यांनी केला. ‘‘आमच्या सैनिकांना झेलाव्या लागणार्या गोळ्या अमली पदार्थांतून आलेल्या पैशातून खरेदी केलेल्या असतात’’ असे प्रतिपादन त्यांनी केले.