अमली पदार्थविरोधी पथकाचे हणजूण, बागातील पबवर छापे

0
13

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने उत्तर गोव्यातील किनारी भागातील पबवर अमलीपदार्थ प्रकरणी छापे घालण्यास सुरुवात केली आहे. किनारी भागातील हणजूण आणि बागा येथील दोन पबवर छापा घालून चौकशी केली जात आहे, अशी माहिती अमलीपदार्थ विरोधी विभागाचे उपअधीक्षक नेल्सन आल्बुकेक यांनी काल दिली.

हैदराबाद पोलिसांनी गोव्यात अमली पदार्थप्रकरणी कारवाई सुरू केल्यानंतर गोवा पोलीस सतर्क झाले आहेत. गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाच्या एका पथकाने हैदराबाद येथे धाव घेऊन अमलीपदार्थ प्रकरणाशी संबंधी सखोल माहिती जाणून घेतली असून अमलीपदार्थ प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे.

हैदराबाद पोलिसांनी गोव्यातील किनारी भागातील दोन रेस्टॉरंटच्या मालकाविरोधात कारवाई सुरू केली आहे. हील टॉप रेस्टॉरंटचा मालक जॉन स्टिफन डिसोझा ऊर्फ स्टीव्ह याला अटक करून हैदराबाद येथे नेले आहे. तर, कर्लिस शॅकचा एडवीन नुनीस याला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. एडवीन नुनीस याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. हैदराबाद पोलिसांकडून अमली पदार्थप्रकरणी गोव्यातील अनेकांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. हैदराबाद पोलिसांनी अमलीपदार्थ प्रकरणी नोंद केलेल्या प्रकरणाची गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विभागाच्या पथकाने माहिती जाणून घेतली असून अमलीपदार्थाचा व्यवहार रोखण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर गोव्यातील किनारी भागातील पब, रेस्टॉरंटमधून अमलीपदार्थचा व्यवहार केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर गोवा जिल्हा पोलीस आणि अमलीपदार्थ विरोधी पथकाने संयुक्तपणे बागा आणि हणजूण येथील पबवर छापा घालून तपास सुरू केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.