‘अमलीपदार्थ सर्वत्र उपलब्ध’ विधानाने खळबळ

0
8

>> कायदा व पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांचे वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र

कायदा व पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या ‘अमलीपदार्थ सर्वत्र उपलब्ध’ या वक्तव्याने काल राज्यात खळबळ उडाली. तसेच त्या विधानावरून मंत्री सिक्वेरा आणि राज्य सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. मंत्री सिक्वेरा यांचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने काल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून वक्तव्याबाबत स्पष्टीकरण जाणून घेतले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण मागवून घेतल्यानंतर हा वाद काहीसा शमला.

आलेक्स सिक्वेरा यांनी मडगाव येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ‘अमलीपदार्थ सर्वत्र उपलब्ध आहेत. केवळ सनबर्नमुळे अमलीपदार्थ पसरलेला नाही’, अशा आशयाचे वक्तव्य केले. मंत्री सिक्वेरा यांचे वक्तव्य सोशल मीडियातून व्हायरल झाल्याने बऱ्याच जणांनी त्यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करून त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

फक्त सनबर्नमुळे अमलीपदार्थांचे तरुण सेवन करतील असे नाही. पोलीस अमलीपदार्थ बाळगणारे व विक्रेत्यांविरोधात कारवाई करतात. त्याकामी नागरिकांनी पोलिसांना मदत केली पाहिजे. तसेच पोलिसांनी जास्त लक्ष देण्याची आणि तत्पर राहण्याची गरज आहे, असेही सिक्वेरा यावेळी म्हणाले होते.आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगश यांनी मंत्री सिक्वेरा यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. जर अमलीपदार्थ सगळीकडे उपलब्ध आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या कामात मंत्र्याने पुढाकार घेतला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

‘अमलीपदार्थाची समस्या जगभर असे म्हणायचे होते’
या वक्तव्यावरून वाद सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री सिक्वेरा यांच्याशी संपर्क साधून स्पष्टीकरण जाणून घेतले. मंत्री सिक्वेरा यांना अमलीपदार्थाची समस्या जगभर असे म्हणायचे होते; मात्र त्यांनी बोलताना ‘समस्या’ऐवजी ‘उपलब्ध’ असा शब्द अनावधानाने वापरला, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिले.