>> मुख्यमंत्री; अमित शहांसोबतच्या बैठकीत सहभाग
गोवा राज्य अमलीपदार्थमुक्त बनविण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. पोलीस यंत्रणेकडून अमलीपदार्थ प्रकरणी कडक कारवाई केली जात असून, या प्रकरणात गुंतलेल्याची गय केली जाणार नाही. परराज्यातून येणार्या काही लोकांकडून अमलीपदार्थाची तस्करी केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित बैठकीत सहभाग झाल्यानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते.
राज्यात बेकायदा वास्तव्य करणार्या नायजेरियन नागरिकांना परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, आत्तापर्यंत ६५० नायजेरियन नागरिकांना परत पाठविण्यात आले आहे. शिल्लक ५० नायजेरियनना परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पर्वरी येथे २०१९ मध्ये झालेल्या एका घटनेच्या वेळी राज्यात सुमारे ७०० नायजेरियन नागरिक बेकायदा राहत असल्याचे आढळून आले होते. राज्यात बेकायदा वास्तव्य करणार्या विदेशी नागरिकांना स्थानबद्ध केंद्रात ठेवले जात आहे. या केंद्रातून आत्तापर्यंत १२९ जणांना मायदेशी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित बैठकीत अमलीपदार्थाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या पश्चिम विभागीय बैठकीमध्ये गोव्यासह गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दमण दीव येथील मंत्री व अधिकार्यांनी सहभाग घेतला.
या बैठकीत अमलीपदार्थांच्या बेकायदा व्यवसायावर कारवाईबाबत चर्चा करण्यात आली. राज्यात पोलिसांच्या अमलीपदार्थ विभागाने अमलीपदार्थांच्या विरोधात जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.