अमरच्या खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक

0
3

>> सी लाऊंज बीच शॅकचा परवाना रद्दसाठी पोलिसांचे पर्यटन खात्याला पत्र

प्रजासत्ताक दिनी सायंकाळी हरमल समुद्रकिनारी सी लाऊंज बीच शॅकसमोर शॅक कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत स्थानिक युवक अमर बांदेकर याचा मृत्यू होण्याची घटना घडली होती. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. ललित ठाकूर आणि विभीषण कुमार अशी संशयितांची नावे आहेत. यापूर्वी सुरेंदर कुमार याला अटक झाली होती. दुसऱ्या बाजूला मांद्रे पोलिसांनी सी लाऊंज बीच शॅकचा परवाना रद्द करावा, अशा आशयाचे पत्र पर्यटन खात्याला पाठवले आहे.

अमर बांदेकर हा तरुण गेल्या रविवारी सायंकाळच्या सुमारास समुद्रकिनारी भागात फिरायला गेला असता त्याला लाकडी खुर्च्या आणि पलंग समुद्राच्या पाण्यापर्यंत घातल्याचे दिसून आल्यानंतर अडथळा होऊ नये यासाठी त्याने एक खुर्ची बाजूला केली. त्याचवेळी सी लाऊंज बीच शॅकचे 10 ते 15 कर्मचारी त्या ठिकाणी गोळा झाले आणि त्यांनी अमर बांदेकर याला जबर मारहाण केली. या मारहाणीतून आपली सुटका व्हावी, यासाठी त्याने धाव घेतली; मात्र तो काही अंतरावरच तो कोसळला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला होता.

हरमल किनारी पर्यटन खात्याने स्थानिकांना व्यवसायासाठी शॅकना परवानगी दिली; परंतु हे शॅक परप्रांतीयांना भाडेपट्टीवर चालवण्यासाठी दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सी लाऊंज बीच शॅक देखील अशाच प्रकारे भाडेपट्टीवर हिमाचलप्रदेशातील व्यक्तींना देण्यात आला होता. पोलीस तपासात हा प्रकार उघड झाल्याने मांद्रेचे पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी सी लाऊंज बीच शॅकचा परवाना तातडीने रद्द करावा, असे पत्र पर्यटन खात्याला पाठवले आहे.