- सरिता नाईक
(फातोर्डा-मडगाव)
मन संकुचित होऊ देऊ नका. ते इतके विशाल असू दे की त्यात सर्व धर्म सामावून जातील. जे जे चांगले असेल ते ते ग्रहण करावे, वाईट सोडून द्यावे. कुठल्याही धर्मग्रंथात वाईट शिकवण दिलेली नाही. मग द्याल ना सर्वांना नवीन सौरवर्षाच्या शुभेच्छा?
नुकतीच नवीन सौर वर्षाची सुरुवात झाली. हा दिवस सर्वच धर्माचे लोक उत्साहात साजरा करतात. पूर्वसंध्येपासूनच धुमधाम सुरू असते. एकमेकांना शुभेच्छा देणंही सुरू असतं. आता वॉट्सऍपचा पर्याय मिळाल्यामुळे सर्वांना शुभेच्छा-संदेश पाठवणं खूपच सोपं झालंय. मीसुद्धा बर्याच जणांना इन ऍडव्हान्स शुभेच्छा-संदेश पाठवले. त्यांच्या प्रतिक्रियाही मिळाल्या. काही कट्टर हिंदुत्ववादी व्यक्तींनीही प्रतिक्रिया दिल्या. त्यातील एक-‘‘आपणास विनंती आहे की, ३१ डिसेंबर साजरा करू नका आणि कुणालाही शुभेच्छा देऊन गुलामीची निशाणी जपू नका. आपलं नवीन वर्ष बुधवार दि. २५ मार्च २०२० गुढीपाडव्याला सुरू होतंय. त्या वर्षी अख्ख्या जगाला बघु दे हिंदू वर्ष कसं भव्य दिव्यतेने साजरं होतं ते! हा संदेश ३१ डिसेंबरपर्यंत पुढे पाठवत रहा. बदल नक्की घडेल. मराठी आहे, मराठीच राहणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार.’’
अशा प्रकारच्या आणखी काही प्रतिक्रिया आल्या पण वानगीदाखल एकच येथे देत आहे.
मला वाटतं आपल्या धर्माचा अभिमान जरूर असावा पण दुराभिमान असू नये. आपला हिंदू धर्म दुसर्याचा द्वेश करायला शिकवत नाही. उलट ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे हिंदू धर्माचे ब्रीद वाक्य आहे.
गुढीपाडवा हा हिंदू धर्माप्रमाणे नववर्षाचा आरंभ आहे हे कुणी नाकारलंच नाही. पण आपले बहुतेक व्यवहार हे सौर वर्षाप्रमाणेच चालतात, ज्याचा आरंभ १ जानेवारीला होतो. आपण आपल्या नेहमीच्या व्यवहारात तारखांप्रमाणे चालतो ना, त्या तारखा या सौरवर्षाच्या आहेत. महिने जानेवारी ते डिसेंबर या सौरवर्षाचे आहेत. आर्थिक वर्ष १ मार्च ते ३० एप्रिल या सौरवर्षाप्रमाणेच असते.
आपल्याला हिंदू वर्षाप्रमाणे व्यवहार करायचा असेल तर तिथीप्रमाणे करावा लागेल. आपल्या मुलांना जर विचारलं की आज तिथी कोणती आहे?… तर ती सांगू शकत नाहीत. तारीख मात्र पटकन् सांगू शकतील. मुलांचं सोडाच, मोठी माणसंसुद्धा कॅलेंडरचा आधार घेतल्याशिवाय तिथी सांगू शकत नाहीत. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे बर्याचशा बाबी आहेत, ज्या हिंदूनाही पूर्णपणे माहीत नसतात. यात नक्षत्रांचा समावेश असतो. नक्षत्रांची नावेच काय त्यांची संख्यासुद्धा सर्वांना माहीत नसते. तिथींची नावं, शुक्ल पक्ष (शुद्ध), कृष्ण पक्ष (वद्य) या सर्वांची माहिती किती जणांना असते?
ख्रिश्चन, मुस्लीम लोकांची जागतिक प्रार्थना असते ती सर्व जगातील त्या त्या धर्माचे लोक रोज म्हणतात. आपली हिंदूंचीसुद्धा एक जागतिक प्रार्थना आहे की जी सर्व हिंदूंना माहीत नाही आणि ती रोज सर्वांकडून म्हटली जात नाही.
गुलामीची निशाणी जपू नका असे हे लोक सांगतात. पण शर्ट-पँट, सूट हा पोशाख आपला हिंदू धर्मियांचा, भारतीयांचा नाही. तरी आपण हा वापरतोच ना! परधर्मियांच्या, परदेशवासियांच्या बर्याच गोष्टी आपण लोकांनी आत्मसात केल्या आहेत. थोडं आत्मपरिक्षण आणि निरीक्षण केलं तर हे आपल्या लक्षात येईल.
दिवसाच्या चोवीस तासात आपण जे काही करतो ते सारं हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणेच असतं का? जे काही वापरतो, खातो, पितो ते सर्व हिंदू धर्माप्रमाणेच आणि भारतीयच असतं का?
परक्या लोकांचा परधर्माचा द्वेष करायचा म्हणून करु नये. स्वधर्माचा अभिमान जरूर असावा पण तितकाच परधर्मालाही मान द्यावा. शेवटी हे धर्म, पंथ, जाती हे देवाने केलेले नाहीत. हे माणसांनीच आपापल्या सोयीसाठी केलेले आहेत. खास धर्म एकच आहे, मानवधर्म. माणसाने, माणसाशी माणसासम वागणे… हाच खरा धर्म आहे. स्वतःचा धर्म जरूर पाळावा पण दुसर्या धर्मांना कमी लेखू नये.
आपल्या महान संतांनीसुद्धा हीच शिकवण दिली आहे. याबाबतीत मला हल्लीच होऊन गेलेल्या श्री सत्यसाईबाबांचा उल्लेख करावासा वाटतो. त्यांच्या प्रार्थनामंदिरात सगळ्याच धर्माचे सण आधुनिक पद्धतीने साजरे केले जातात. जेथे जेथे त्यांचे साधक आहेत तेही धर्माधर्मामध्ये भेद करत नाहीत. इथे कोणा एका धर्माचे प्राबल्य नसते. सारे धर्म समान मानले जातात. कारण येथे मानवधर्मालाच जास्त महत्त्व दिले जाते.
सांगायचा उद्देश इतकाच की मन संकुचित होऊ देऊ नका. ते इतके विशाल असू दे की त्यात सर्व धर्म सामावून जातील. जे जे चांगले असेल ते ते ग्रहण करावे, वाईट सोडून द्यावे. कुठल्याही धर्मग्रंथात वाईट शिकवण दिलेली नाही. मग द्याल ना सर्वांना नवीन सौरवर्षाच्या शुभेच्छा? आताही द्या आणि गुढीपाडव्यालाही द्या. दोन वेळा शुभेच्छा दिल्या म्हणून काही बिघडत नाही.
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!