
अखेर दक्षिण भारतीय सिने जगतातील एक दिग्गज अभिनेते सुपरस्टार रजनीकांत यांनी काल स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा करीत दक्षिणेतील चित्रपट कलाकारांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याची परंपरा पुढे चालू ठेवली. राजकीय क्षेत्रातील आपला प्रवेश ही काळाची गरज होती आणि तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणूक आपण लढविणार असल्याचेही रजनीकांत यांनी जाहीर केले. रजनीकांत यांच्या या भूमिकेमुळे तामिळनाडूतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
चेन्नईतील राघवेंद्र सभागृहात रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांशी काल संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की आपा राजकारणातील प्रवेश ही काळाची गरज होती. येत्या विधानसभा निवडणुकीत आपला स्वतंत्र पक्ष सर्व २३४ जागा लढवणार आहे. तामिळनाडूत सध्या लोकशाहीची अवस्था अतिशय वाईट आहे. देशातील अन्य राज्यांमधील लोक येथील स्थिती पाहून थट्टा करतात. त्यामुळे एवढे दिवस राजकारणात का आलो नाही याची आपल्याला खंत वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रजनीकांत यांनी व्यक्त केली.
आपल्या तामिळनाडूतील ही स्थिती बदलायची आहे असे ते म्हणाले. जनतेचा १०० टक्के पाठिंबा मिळेल अशी खात्री ही त्यांनी व्यक्त केले.