>> बॉलिवूडला धक्का, धोनीवरील बायोपिकने खरी ओळख
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (३४) याने काल रविवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र या संबंधी पोलीस तपास करत आहेत. शनिवारी रात्री सुशांतचे काही मित्र त्याच्या घरी होते. रविवारी सकाळी बराचवेळ सुशांतने घराचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणार्या नोकराने दरवाजा तोडला. यावेळी सुशांतचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्य अवस्थेत होता, असे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. सुशांत नैराश्यावर उपचार घेत असल्याची एक फाईलही पोलिसांना सुशांतच्या घरी सापडली आहे. ’एमएस धोनी द अनटॉल्ड स्टोरी’ या सिनेमात महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेत दिसलेल्या सुशांतच्या मृत्यूनंतर मनोरंजन, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रांतूनही शोक आणि प्रचंड धक्का व्यक्त करण्यात येत आहे.
मनोरंजन क्षेत्रासाठी हा मोठा धक्का असून सुशांतचे चाहतेही या बातमीने हादरून गेले आहेत. आपल्या करिअरमध्ये जोरदार घोडदौड सुरू असताना सुशांतने आत्महत्या का केली असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. राजकीय नेत्यांनाही सुशांतच्या मृत्यूच्या बातमीनं धक्का बसला आहे.छोट्या पडद्यापासून करिअरला सुरुवात करणार्या सुशांत याने नंतर बॉलिवूडमध्येही आपले स्थान पक्के केले होते.
दूरदर्शन अभिनेता म्हणून सुरूवात
सुशांतसिंह राजपूत याने आपल्या करिअरची सुरूवात ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेपासून केली. मात्र त्याची खरी ओळख एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून झाली. यानंतर सुशांत याने बॉवूडमध्ये एंट्री केली. ‘काय पो छे’ हा सुशांतचा पहिला चित्रपट होता. या पहिल्याच चित्रपटात त्याच्या अभिनयाची चुणूक दिसली व त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. यानंतर सुशांतने परिणीती चोप्रासोबत ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटात काम केले. पण त्याची खरी ओळख झाली ती भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक ‘एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने. या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली. सोनचिडिया, छिछोरे तसेच सारा अली खानसोबतच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटांतूनही आपल्या अभिनयाची चुणूक त्याने दाखवली होती.
बॉलिवूड हादरले
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूडला जबर धक्का बसला आहे. याबाबत अनेक कलाकारांनी ट्विटरद्वारे या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. मी नि:शब्द आहे, अशा भावना अभिनेता अक्षयकुमार याने व्यक्त केल्या. आपण एका गुणी अभिनेत्याला आपण मुकल्याचे सांगत अक्षय कुमारने श्रद्धांजली वाहिली. शाहरुख खाननेही सुशांतमधील ऊर्जा, उत्साह आणि त्याचा सदा हसतमुख चेहरा सर्वकाळ स्मरणात राहील अशा भावना व्यक्त केल्या.
राजकीय व्यक्तीही हेलावल्या
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे मनोरंजन क्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रही हेलावले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या अभिनयाने अनेकांना प्रेरणा दिली. आपले शानदार अविस्मरणीय परफॉर्मन्स तो मागे सोडून गेलाय. त्याच्या निधनाच्या बातमीनं धक्का बसल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हिंदी सिनेमाचा तरुण कलाकार सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची बातमी स्तब्ध करणारी आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले आहे.
सुशांत अभिनित चित्रपट
२०१३ ः काय पो छे (फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार)
२०१३ ः शुद्ध देसी रोमान्स
२०१४ ः पी. के. सर्फराझ
२०१५ ः डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी!
२०१६ ः एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी