अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी अमली पदार्थ प्रकरणात छापा

0
96

बॉलिवूडमधील अमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल याच्या मुंबईतील घरावर काल अमलीपदार्थ विरोधी विभागाकडून (एनसीबी) छापा मारण्यात आला. गेल्या महिन्यात अर्जुन याची मैत्रीण गाब्रिएला दिमेत्रियादिस हिच्या ऍगिसियालोस या भावाला एनसीबीने अटक केली होती. त्यासंदर्भात ही छापेमारी करण्यात आली.

अर्जुन रामपाल याच्या वांद्रे येथील निवासस्थानी, तसेच खार व अंधेरी येथील दोन ठिकाणी हे छापे मारण्यात आले. परवा रविवारी एनसीबीने चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला याच्या निवासस्थानावर छापा मारला होता. फिरोजची पत्नी शबाना नाडियाडवाला हिला एनसीबी कार्यालयात जबानी नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते, त्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. फिरोज याला काल चौकशीसाठी एनसीबीने पाचारण केले होते.

एनसीबीने गेल्या शनिवारी मुंबईच्या विविध भागांत छापे मारून अमली पदार्थ जप्त केले होते. आतापर्यंत या प्रकरणात २३ हून अधिक जणांना अटक झाली आहे. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, सुशांतसिंह राजपूत याचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा, मदतनीस दीपेश सावंत आदींचा त्यात समावेश होता. ७ ऑक्टोबरला रियाला जामीन मिळाला, मात्र, तिच्या भावाचा जामीन नाकारला गेला आहे.

अभिनेत्री दीपिका पडुकोणची व्यवस्थापक करिष्मा प्रकाश हिला काल चौकशीसाठी एनसीबीने पुन्हा पाचारण केले होते. तिच्या घरी टाकलेल्या छाप्यात हशीश व सीबीडी ऑईल सापडली होती.